उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा उपक्रम

पनवेल : आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ‘माझी वसुंधरा अभियान ६.०' अंतर्गत ‘उत्सव गणपतीचा, जागर पर्यावरणाचा' अशी संकल्पना घेऊन एक विशेष पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पारंपरिक उत्साहाला पर्यावरण रक्षणाची जोड देण्याच्या दृष्टीने महापालिका तर्फे आयोजित स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण ७ ऑगस्ट रोजी परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे आणि उपायुक्त स्वरुप खारगे यांच्या हस्ते मुख्यालय येथे करण्यात आले.  

महापालिकेने आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेमध्ये प्लास्टिक मुक्त, थर्मोकोल विरहित, बायोडिग्रेडेबल सजावट, नैसर्गिक आणि नैसर्गिकरित्या विघटित होणारे साहित्य यांचा वापर प्रोत्साहित केला जात आहे. सदर स्पर्धा केवळ बक्षिसासाठी नसून, एक सामाजिक आणि पर्यावरणीय संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम आहे. घराघरातून आणि मंडळांमधून पर्यावरणपुरकतेचा विचार रुजला, तर संपूर्ण शहर अधिक स्वच्छ, हरित आणि टिकाऊ होण्यास मदत होण्याच्या दृष्टीने आयोजित केली असल्याचे उपायुक्त स्वरुप खारगे यांनी सांगितले. पनवेलकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा आणि आपल्या सजावटीमधून पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वदूर पोहोचवावा, असे आवाहनही उपायुवत खारगे यांनी केले आहे.

सदर स्पर्धा घरगुती आणि सार्वजनिक दोन्ही गटांसाठी खुली आहे. या स्पर्धेमध्ये पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट साहित्य, नैसर्गिक रंग, पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू यांचा वापर अनिवार्य आहे. या स्पर्धेसाठी एकूण १ लाख रुपयांची बक्षीस राहणार आहेत. सहभागासाठी  स्पर्धकांनी २४ ऑगस्ट २०२५ पर्यंत www.pmc.majhivasundhara.org या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी. नागरिक आणि मंडळ दिलेल्या  वयूआर कोडद्वारे किंवा संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करु शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक-७४००१००७३७. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिवाळीमध्ये पॉड टॅक्सीचे भूमीपुजन -ना. सरनाईक