नवी मुंबई महापालिका मधील सर्वपक्षीय भ्रषटाचार ‘आप' संपविणार! ​​​​​​​

सत्ताधारी पक्षाच्या संधीसाधू, भ्रष्ट राजकारणामुळे पक्ष स्वयंसेवकांची नैतिकता मोडीत -धनंजय शिंदे

नवी मुंबई : सध्याच्या घडीला महाराष्ट्रात जनसामान्यांना पायदळी तुडवत जे फक्त संधीसाधू राजकारण चालू आहे, त्याचा वीट आला आहे. ‘संविधान'च्या विरोधात जाऊन सर्वच भ्रष्टाचाऱ्यांना जवळ करुन सत्तेवर आलेल्या राजकीय पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांचे मनोबल तुटले असून, पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आणि संभ्रमावस्था आहे. बरेसचे कार्यकर्ते आता तसे उघडपणे बोलून देखील दाखवत आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाचे भवितव्य, सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता अशा दुष्टचक्रातून वर आलेल्या संधीसाधू नेत्यांकडे नसून त्यांच्यासाठी जीवाचे रान करुन, त्यांना मोठे करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्ता, संधीसाधू नेत्यांना खुर्चीवरुन खाली खेचायची पण शक्ती बाळगून आहे, असे ववतव्य ‘आम आदमी पार्टी'चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी नवी मुंबईतील वॉर्ड कमिट्यांच्या आढावा बेठकीवेळी केले आहे.

एकंदरीतच सत्ताधारी पक्षाच्या संधीसाधू आणि भ्रष्ट राजकारणामुळे कट्टर पक्ष स्वयंसेवकांची नैतिकता मोडीत निघाली आहे. पण, आगामी काळात नवी मुंबई महापालिकेमधील सर्वपक्षीय भ्रष्टाचार संपविण्याचे काम ‘आम आदमी पार्टी' करेल, असे धनंजय शिंदे म्हणाले.

‘आप'चे महाराष्ट्र सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी महाराष्ट्रातील ‘आप'च्या सर्व जिल्हा अध्यक्षांना महाराष्ट्रातील प्रत्येक प्रभाग आणि बुथ पातळीवर स्थानिक टीम्स सक्रिय करुन कार्यकारिणी बनविण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार येणाऱ्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ‘आप'च्या वॉर्ड टीम्स सक्रिय झाल्या असून काही ठिकाणी वॉर्ड टीम्स बनविण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार १५ जुलै रोजी नवी मुंबईतील वॉर्ड कार्यकारिणीचा आढावा घेण्यासाठी ‘राज्य समिती'च्या उपस्थितीत, ‘आप'च्या ३ वॉर्ड कार्यालयांमध्ये बैठका झाल्या.

यातील पहिली आढावा बैठक सकाळी ११ वाजता कोपरखैरणे वॉर्ड कार्यकारिणी मधील सुमित कोटियान, नीना जोहरी, आरती शाह, मधू चावला, राहुल मेहरोलिया, किरण कोद्रे, पटेल सर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. तर दुसरी आढावा बैठक दुपारी २ वाजता ऐरोली कार्यकारिणीतील देवराम सुर्यवंशी, विजया सुर्यवंशी, प्रीती शिंदेकर, आरती सोनावणे, मिलिंद तांबे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. तिसरी आढावा बैठक सायंकाळी ४ वाजता दिघा कार्यकारिणीतील संतोष केदारे, दिनेश ठाकूर, अरविंद गुप्ता आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

modi@9 महा-जनसंपर्क-अभियान अंतर्गत बेलापूर विधानसभा क्षेत्रात टिफीन बैठकीच आयोजन