मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदार यादीची पडताळणी

मतदार यादीत महिला, युवकांच्या नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करणार -जिल्हाधिकारी शिनगारे

ठाणे : जिल्ह्यातील मतदार यादी परिपूर्ण, दोषविरहित आणि अचूक असावी, यासाठी छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याअंतर्गत २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदानकेंद्रातील घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा करणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे दिली.

१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ७ जुलै रोजी राजकीय पक्षांची बैठक घेतली. तसेच त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार वृषाली पाटील, आदि उपस्थित होते.

अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम पूर्वी दोन महिने चालत होता. पहिल्यांदाच सदर कार्यक्रम १ जून ते ३१ डिसेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत राबविला जाणार आहे. जिल्ह्यातील मतदार यादी परिपूर्ण असावी, यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालय आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. पात्र मतदारांची नावे यादीत यावीत यासाठी तसेच मयत अथवा कायम स्थलांतरीतांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेटी देऊन मतदारांची नावे आणि नोंदीतील दुरुस्ती तपासणार आहेत. तसेच पात्र असलेले परंतु ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत, त्यांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मदत करणार आहेत. संभाव्य मतदारांची नोंदणीसाठीही प्रयत्न करणार आहेत. सदर करत असताना पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार आहे. राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकांनीही बीएलओंना सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले.

या कार्यक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात मतदान केंद्रांचे सूसुत्रीकरण करण्यात येणार आहे. याअंतर्गत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर असलेल्या २२४ मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी शासकीय, निमशासकीय इमारतींची माहिती घेत आहोत. जिल्ह्यासाठी पंचकुला (हरियाणा) आणि बेंगलोर येथून मतदान यंत्रे मिळणार आहे. सदर मतदान यंत्रे तीन गोदामामध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात येणार असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांची प्रथमस्तरावरील तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी सांगितले.

राजकीय पक्षांसोबत आयोजित सदर बैठकीस ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)'चे विजय देसाई, सचिन पाटील, ‘भाजपा'चे अण्णा आशिनकर, शिवसेना पक्षाचे अरुण रेडकर, अनिल भोर, ‘मनसे'चे नैनेश पाटणकर, ‘आप'चे सतीश शिंदे, सतीश सलूजू, संकेत वाडकर, ‘काँग्रेस'चे शिरीष घरत, अँड. निशिकांत कोळी, विजय बनसोडे, ‘राष्ट्रवादी'चे प्रभाकर सावंत, आदि उपस्थित होते.

मतदार यादीत महिला आणि युवकांच्या नोंदणीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते. यासाठी जिल्ह्यातील महिला, युवा मतदारांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये मतदान नोंदणी शिबिर, समाज माध्यमांद्वारे जनजागृती, गृहनिर्माण सोसायट्यांमार्फत शिबिर आदि उपक्रम राबविण्यात येत आहे. राजकीय पक्षांनी यासाठी सहकार्य करावे. जास्तीत जास्त महिला आणि युवकांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा. -अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी- ठाणे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

रबाले रेल्वे स्थानकाबाहेर सरकारच्या विरोधात एक सहि संतापाची मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद