मनसे'च्या दणवयानंतर महापालिकेला जाग

‘ऐरोली स्पोर्टस्‌ कॉम्प्लेवस'ला थकबाकी वसुलीसाठी नोटीस; ‘डी.वाय.पाटील स्पोर्टस्‌ ॲकॅडमी'कडे दुर्लक्ष?

नवी मुंबई : नवी मुंबई मधील खाजगी क्रीडा संकुलांना नियमानुसार अनिवासी, व्यावसायिक मालमत्ता कर आकारण्यासहत्यांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यापासून ते आजपर्यंतचा अनिवासी मालमत्ता कर आकारण्यात यावा यासाठी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी महापालिका प्रशासनाकडे वर्षभरापासून केलेल्या पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश आले आहे. यासंदर्भात महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला जाग आली असून आयुवतांच्या निर्देशानंतर शहरातील सर्व खाजगी क्रीडा संकुलांच्या मालमत्तांचे पुनर्वालोकन करीत  मालमत्ता विभागातर्फे संबंधित क्रीडा संस्थांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

दरम्यान, एकीकडे महापालिकेने ऐरोली स्पोर्टस्‌ कॉम्प्लेवसला अनिवासी, व्यावसायिक मालमत्ता कर आकारताना नियमानुसार ७० लाखांच्या थकबाकी वसुलीसाठी नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे मालमत्ता कर विभाग डी. वाय. पाटील स्पोर्टस्‌ ॲकॅडमीकडून थकबाकी वसुलीसाठी चालढकलपणा करीत असल्याचा आरोप सविनय म्हात्रे यांनी केला आहे.
नवी मुंबईत खासगी क्रीडा संकुले, स्पोर्टस्‌ क्लब, स्पोर्टस्‌ अकॅडमी यांची सदस्यत्वता घेणे म्हणजे श्रीमंतांची मक्तेदारी झाली आहे. अशा स्पार्टस्‌ क्लबचे सदस्यत्व घेण्यासाठी सदर संस्थांकडून लाखो रुपये ‘मेंबरशिप फी'च्या नावाखाली घेतले जातात. संपूर्णपणे व्यावसायिक बनलेल्या अशा क्रीडा अकादमींना महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातर्फे व्यावसायिक- अनिवासी मालमत्ता कर आकारणे क्रमप्राप्त आहे. परंतु. नवी मुंबईतील काही क्रीडा अकादमींवर महापालिका मेहेरबान असल्याने अशा क्रीडा अकादमींना मालमत्ता विभागातर्फे नियमबाह्य निवासी मालमत्ता कर आकारला जात होता. परिणामी, महापालिकेचा महसूल बुडत होता. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करुन संबंधित खाजगी क्रीडा संकुलांना नियमानुसार अनिवासी, व्यावसायिक मालमत्ता कर आकारण्याची मागणी केली होती. तसेच भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यापासून ते आजपर्यंतचे अनिवासी मालमत्ता कर आकारण्यात यावे, असेही सविनय म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केलेल्या मागणी पत्रात नमूद केले होते. त्यासाठी सविनय म्हात्रे यांनी वर्षभरापासून पाठपुरावा सुरु ठेवला होता.

काही दिवसांपूर्वी सविनय म्हात्रे यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घ्ोऊन सदर सर्व प्रकरणाची माहिती त्यांना दिली. सदर प्रकाराची आयुवत नार्वेकर यांनी गंभीर नोंद घेताच महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला जाग आली. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानंतर शहरातील सर्व खाजगी क्रीडा संकुलांच्या मालमत्तांचे पुनर्वालोकन करण्यासाठी मालमत्ता कर विभागाने नोटीसा बजावण्यात आल्या. त्यानुसार ऐरोली येथील ऐरोली स्पोर्टस्‌ कॉप्लेक्स या संस्थेला अनिवासी, व्यावसायिक मालमत्ता कर आकारण्यात आला असून नियमानुसार त्यांच्याकडून जवळपास ७० लाखांची थकबाकी वसूल करण्यात येणार आहे.

एकीकडे ऐरोली मालमत्ता कर विभागाने याबाबत कडक धोरण स्वीकारले असताना मात्र या विभागाने नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्पोर्टस्‌ ॲकॅडमी बाबत चालढकलपणा केल्याचा आरोप ‘मनसे'चे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी केला आहे. डी. वाय. पाटील स्पोर्टस्‌ अकॅडमी या खासगी क्रीडा संस्थेत सुसज्ज व्यायामशाळा, तरणतलाव, कॅफे, हॉटेल असून याचा पूर्णपणे व्यावसायिक वापर केला जात आहे. या संस्थेत सदस्यत्वासाठी नागरिकांकडून लाखोंची रक्कम स्वीकारली जाते. ‘मनसे'च्या तक्रारीनंतर मागील वर्षभरात मालमत्ता कर विभागातर्फे डी. वाय. पाटील संस्थेला ७-८ नोटीसा बजावण्यात आल्या असून या संस्थेकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही, असे उत्तर मालमत्ता कर विभागाकडून देण्यात येत आहे, असे सविनय म्हात्रे यांनी सांगितले.

नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्पोर्टस्‌ ॲकॅडमी बाबत महापालिका बोटचेपी धोरण अवलंबत असून अशा बड्या संस्थांना झुकते माप दिले जात आहे. यामुळे महापालिकेचा महसूल बुडवला जात आहे. डी. वाय. पाटील स्पोर्टस्‌ अकॅडमी या संस्थेस लवकरात लवकर अनिवासी, व्यावसायिक मालमत्ता कर आकारावा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल. -सविनय म्हात्रे, उपशहर अध्यक्ष-मनसे, नवी मुंबई.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उध्दव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ववतव्य