ठाणे जिल्ह्याला जिल्हा नियोजन निधीतून भरघोस निधीचे वाटप

शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हितासाठीच राज्य शासनाचे निर्णय -ना. शंभूराज देसाई
 

ठाणे : गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी ‘जिल्हा नियोजन समिती'च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी देण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाणे येथे दिली.

राज्य शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त पालकमंत्री देसाई यांनी ३ जुलै रोजी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सदर माहिती दिली. याप्रसंगी आमदार शांताराम मोरे, डॉ. बालाजी किणीकर, गीता जैन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात झालेल्या विकास कामांची माहिती देऊन ना. देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून सोपविलेली जबाबदारी पार पाडताना जिल्ह्याच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून कामांना प्राधान्य दिले आहे. ठाणे जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठ्या ‘समूह विकास प्रकल्प'ची (क्लस्टर) सुरुवात नुकतीच मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाली आहे. यातून सुमारे दहा हजार घरांची निर्मिती होणार आहे. याबरोबरच मीरा-भाईंदर, दिवा या क्षेत्रात सुध्दा क्लस्टर राबविण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील मेट्रो मार्गाचे जाळ्यामुळे वाहतूक सुविधा वाढण्यास मदत होणार असून वाहतुकीची कोंडी दूर होईल. वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग-४ गायमुखपर्यंत वाढविण्यात येत आहे. ठाणे ते भिवंडी मेट्रो लाईन-५, ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, कल्याण-तळोजा मेट्रो-१२, गायमुख ते मीरारोड मेट्रो-१० आदि ‘मेट्रो'च्या कामांना गती मिळत आहे. याशिवाय तसेच विविध रस्ते विकासाची कामे वेगाने सुरु आहेत. विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग, ऐरोली-काटई नाका मुक्त मार्ग, ठाणे सागरी किनारा मार्ग, भिवंडी-कल्याण-शीळफाटा रस्त्याचे सहा पदरीकरण अशी कामे होत आहेत. याशिवाय कोपरी उड्डाणपुल, कळवा खारीगाव उड्डाणपुलाची उभारणी, मुंब्रा वाय जंक्शन उड्डाणपुल, कल्याणमधील पत्री पुल आणि दुर्गाडी पुलांची कामे झाली आहेत, असे ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान' अंतर्गत शहरात रस्त्यांचे मजबूत जाळे उभारण्यात येत असून सुमारे ६१० कोटींच्या निधीतून २८२ रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. सदर सर्व रस्ते सिमेंटचे करण्यात येत आहेत. मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ९५ % पूर्ण झाले आहे, असे ना. देसाई म्हणाले.

नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे, नवी मुंबईत महाराष्ट्र भवन निर्मिती असे निर्णय या शासनाने घेतले आहेत. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरात एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसराच्या सुशोभिकरणासाठी १३८.२० कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकास योजना अंतर्गत महापालिकांना एकूण १६५१.९६ कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर आणि शहापूर नगरपरिषद-नगरपंचायती यांना विविध योजना अंतर्गत सुमारे १०४.४६ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजना'मधून रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे, अशी माहिती देखील ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली.

‘भाजपा-शिवसेना युती' शासन शेतकरी, सर्वसामान्यांच्या हितासाठीच निर्णय घेत असून राज्यातील सर्व जनतेच्या आरोग्यासाठी ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना'ची मर्यादा आता १ लाखावरुन ५ लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. राज्यात ७०० आपला दवाखाने सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गरीबांचा सण आनंदात जावा यासाठी आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे राज्यातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरु आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ३ लाख जणांना विविध सेवा देण्यात आल्या आहेत. - ना.शंभूराज देसाई, पालकमंत्री-ठाणे जिल्हा.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईतील नागरी समस्या सोडवा