आ. मंदाताई म्हात्रे यांच्या ‘आमदार निधी'तून आग्रोळी गांव येथे सभा मंडपाची निर्मिती

 

सभा मंडपासह इतर स्थापत्य कामांचे भूमीपुजन संपन्न

नवी मुंबई :आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या बेलापूर विधानसभा क्षेत्रात विकास कामांचा तडाखा सुरुच आहे. त्याअनुषंगाने २ जून रोजी आग्रोळी गांव येथील सहकार महिला मंडळाकरिता सभा मंडप आणि इतर स्थापत्य कामांचा भूमीपुजन सोहळा आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण म्हात्रे आणि अरुण डोंगरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी गजानन पाटील, राजेश पाटील, दिलीप वैद्य, सुधीर पाटील, स्वरुप पाटील, निलेश पाटील, महिला वर्ग तसेच आग्रोळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आग्रोळी गावामध्ये खूप जुने सहकार महिला मंडळ असून ग्रामस्थांच्या माध्यमातून सदरची वास्तू उभी राहिली आहे. ‘सहकार महिला मंडळ'च्या विनंती वरुन सदर इमारतीच्या अवतीभवती असलेल्या मोकळ्या जागेमध्ये आमदार विकास निधीमधून सभा मंडप उभारणे तसेच स्त्री-पुरुषांकरिता २ शौचालय, पाण्याची व्यवस्था आणि इतर स्थापत्य कामे केली जाणार आहे. यामुळे येथील स्थानिक नागरिकांचे उन्हाळा-पावसाळा पासून संरक्षण होईल तसेच लग्न कार्यालय, वाढदिवस आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता सभा मंडपाचा ग्रामस्थांना फार मोठा फायदा होणार आहे. या सर्व विकास कामांसाठी ३८ लाख रुपयांचा आमदार निधी मंजूर करुन घेतला आहे, अशी माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, आग्रोळी गावासाठी स्मशानभूमीची आवश्यकता होती, त्याबाबत येथील महिला मंडळ, गणपती मंडळ आणि स्थानिक ग्रामस्थांनी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडे मागणी केली होती. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांना एकत्र घेऊन त्यांनी सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांच्या समवेत बैठका घेऊन सदर स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावला होता. त्यामुळेच ‘सहकार महिला मंडळ'च्या अध्यक्षा सौ. कुसुम म्हात्रे, सचिव कस्तुरी पाटील, समाजसेवक रोहिदास पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांची पूर्तता पाहून आनंद व्यक्त केला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ठाणे जिल्ह्याला जिल्हा नियोजन निधीतून भरघोस निधीचे वाटप