‘मनसे'चे ‘सिडको'ला निवेदन

खारघर मधील पाणी समस्या दूर करण्याची मागणी

खारघर : खारघर शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तर काही भागात गढूळ पाणी पुरवठा होत आहे. गढूळ पाण्याची लॅब द्वारे तपासणी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'च्या शिष्टमंडळाने ‘सिडको'च्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना दिले. या शिष्टमंडळात ‘मनसे'चे पनवेल महानगर अध्यक्ष योगेश जनार्दन चिले, सचिव पराग बालड, पनवेल महानगर उपाध्यक्ष संदिप जाधव, संजय मुरकुटे, मनसैनिक भिमराव काका, कुंडलिक तिकोणे, खारघर मधील मनसे पदाधिकारी गणेश बनकर आदींचा सहभाग होता.

खारघर शहराच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. मात्र, खारघर शहरात वाढीव पाणी पुरवठासाठी सिडकोकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. पाणी कपातीच्या नावाखाली आज अनेक सोसायटीत पाणी पुरवठा होत नाही. तसेच अनेक भागात गढूळ पाणी पुरवठा होत आहे. अशुध्द पाण्यामुळे पावसात आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘सिडको'ने शासकीय लॅब मध्ये पाणी तपासणी करावी तसेच खारघर शहरातील पाणी पुरवठ्यात वाढ होण्यासाठी उपाययोजना करावी, या मागणीचे निवेदन ‘मनसे'ने ३० जून रोजी ‘सिडको'च्या खारघर येथील पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना दिले.

सिडको प्रशासनाकडे पाणी तपासणीची मागणी करण्यात आली आहे. तसेच ‘मनसे'द्वारे वेगळ्या लॅब मध्ये पाणी तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडले जाणार आहे. - गणेश बनकर, पदाधिकारी - मनसे, खारघर. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘आप'तर्फे ठाणे येथे सहभोजन सभा संपन्न