`modi@9 महा-जनसंपर्क-अभियान'

‘अभियान'द्वारे ज्येष्ठ नागरिकांशी एकत्र संवाद साधण्याची इच्छा पूर्ण - आ.मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपा सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली असून पंतप्रधान मोदी यांच्या धाडसी विचारांमुळे आणि घेतलेल्या करोडो जनतेच्या हिताचा निर्णयामुळे देशामध्ये विकास कामांच्या उभारणीत मोदी सरकारचे महत्वपूर्ण योगदान पहावयास मिळत आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी ९ वर्षात  केलेल्या लोकहितांच्या कामांचा अहवाल देशभरात भारतीय जनता पार्टी `modi@9 महा-जनसंपर्क-अभियान'च्या माध्यमातून घराघरात पोहचविण्याचे काम करीत आहेत. याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्रात आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्फत २५ जून रोजी सानपाडा येथील वडार भवन येथे ‘ज्येष्ठ नागरिकांसमवेत संवाद-स्नेहभोजन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात ‘भाजपा'चे माजी जिल्हाध्यक्ष भगवानराव ढाकणे, सी. व्ही. रेड्डी, गोपाळराव गायकवाड यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. तर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दैनंदिन नोंदवही देऊन ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत केले.

बेलापूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक विरंगुळा केंद्राला माझी भेट असते. पण, आज आपण सर्व ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करुन त्यांच्याशी संवाद साधण्याची माझी इच्छा सदर कार्यक्रमाद्वारे पूर्ण झाली आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने आपल्या आयुष्यात आलेले प्रसंग, सुख दुःखाचे चढ-उतार संदर्भात आलेले अनुभव व्यक्त केले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात झालेली विकास कामे यांचा आढावा देखील सदर कार्यक्रमात घेण्यात आल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.
देशावर कोरोनाचे संकट आले होते तेव्हा देशाची सर्व यंत्रणा ठप्प झाली होती. गोर-गरीब जनता मृत्यूमुखी पडू लागली आणि हॉस्पिटल्स अपुरे पडायला लागली होती. लोकांचे जीवनमान खालावले, जवळचे नातेवाईक मित्र-परिवार दुरावले गेले. या सर्वांचा विचार करता बेलापूर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव आणून त्यासाठी भूखंड उपलब्ध करुन घेतला. सद्यस्थितीत हॉस्पिटल उभारणीसाठी निविदा प्रक्रियेचे काम प्रगतीपथावर आहे. याठिकाणी सर्वच मोठ्या आजारांवर सर्वसामान्य रुग्णांना सेवा मिळणार असून युवकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील गांव दत्तक योजना अंतर्गत दिवाळे गाव दत्तक घेतले असून नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गाव-स्मार्ट व्हिलेज म्हणून नावारुपास येणार आहे. मी निवडून आल्यापासून बेलापूर विधानसभा क्षेत्रात माझ्या आमदार निधीमधून ज्येष्ठ विरंगुळा केंद्र बांधून दिले आहेत. सानपाडामधील गोर-गरीब नागरिकांपर्यंत पोहोचलेली औषधे, अन्नधान्य आणि इतर आवश्यक असलेल्या वस्तू या सर्वांचे साक्षीदार तुम्हीच ज्येष्ठ नागरिक आहात, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

सदर कार्यक्रमाप्रसंगी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यासमवेत ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी जिल्हाध्यक्ष सी.व्ही.रेड्डी, भगवान ढाकणे, गोपाळराव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, ज्येष्ठ नागरिक श्रीपद पत्की, प्रभाकर गुमास्ते, राजाराम खैरनार, मधुकर पाटील, माजी नगरसेवक सुनील पाटील, जिल्हा महामंत्री विजय घाटे, निलेश म्हात्रे, ‘युवा मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, विकास सोरटे, चिंतामणी बेल्हेकर, तालुका महामंत्री रमेश शेट्टे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पांडुरं आमले तसेच मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होत्या.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाने ज्येष्ठ असून देखील आज तरुण वयाप्रमाणे काम करीत आहेत. आज जो मान-सन्मान आपल्या देशाला मिळाला आहे, तो केवळ मोदी यांच्यामुळे मिळाला आहे. वयाने माणूस कितीही मोठा असो;  परंतु काम करणारा माणूस कुठेही आणि कसाही काम करु शकतो. त्याला काम करण्याची आवड आणि जिद्द पाहिजे; तरच तो काम करु शकतो. - आमदार सौ. मंदाताई म्हात्रेे, बेलापूर.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शासन आपल्या दारी अंतर्गत उद्योग मंत्री तथा ‘रायगड'चे पालकमंत्री उदय सामंत यांची उद्योजकांशी चर्चा