उलवे भागात मशिदीसाठी भूखंड देण्यास सकल हिंदू समाजाचा विरोध
सकल हिंदू समाजाने मोर्चा काढून सिडकोला दिला इशारा
नवी मुंबई : उलवे भागात मशिद बांधण्यासाठी सिडकोने भूखंड देण्याच्या हालचाली सुरु केल्याने या मशिदीला विरोध करण्यासाठी शनिवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने उलवेमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये भाजप, मनसे, शिवसेना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रिलायन्स जिओ येथून सुरुवात झालेल्या या मोर्चाचा समारोप शगून चौकात करण्यात आला. त्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाने सिडको कार्यालयातील अधिकारी प्रशांत भांगरे यांना याबाबतचे निवेदन दिले. तसेच सिडकोने मशिदीसाठी भुखंड दिल्यास सदर मशिद पाडण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी यावेळी दिला.
सिडकोने सेक्टर-19 मध्ये मशिदीसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्याने या मशिदीला उलवे भागात राहणाऱया हिंदू बहुल नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. या भागात मशीद होऊ नये यासाठी उलवे भागातील नागरिकांचे विरोध दर्शवणारे हरकतीचे अनेक पत्र सिडकोला देण्यात आले असताना, देखील सिडको प्रशासनाकडुन याबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने उलवेमध्ये मोर्चा काढण्यात आला. रिलायन्स जिओ येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सिडकोने या ठिकाणी मशिदीला भूखंड देऊ नये, अशी मागणी या मोर्चात सहभागी झालेल्या सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली. शगून चौकात या मोर्चाचा समारोप झाल्यानंतर शिष्टमंडळाने सिडको कार्यालयातील अधिकारी प्रशांत भांगरे यांना याबाबतचे निवेदन दिले.