खारघर उष्माघात मृत्यू प्रकरणी ‘आप-महाराष्ट्र'तर्फे पनवेल न्यायालयात तक्रार
तक्रारीत राज्याचे मुख्य सचिव, सांस्कृतिक विभाग, नवी मुंबई पोलीस आयुवत, खारघर पोलीस ठाणे प्रतिवादी
नवी मुंबई : १६ एप्रिल २०२३ रोजी खारघर मधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी झालेल्या श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणी शासनासह इतर संबंधितांविरोधात सदोष गुन्हा दाखल होण्याबाबत ‘आम आदमी पार्टी'तर्फे पनवेल न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर १६ जून रोजी फवत युवतीवाद झाला. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १ जुलै २०२३ रोजी होणार असून यावेळी न्यायालय योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा ‘आप'चे राज्य नेते धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी व्यवत केली आहे.
दरम्यान, न्यायालयात ज्येष्ठ वकील ॲड. असिम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आप-महाराष्ट्र'ची लीगल टीम ॲड. जयसिंग शेरे, ॲड. सुवर्णा जोशी, आदि कामकाज पाहत आहेत.
१६ एप्रिल २०२३ रोजी खारघर येथे झालेल्या पदमश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये १४ श्री सदस्यांचा उष्माघात, चेंगराचेंगरी यामुळे मृत्यू तसेच अनेकजण जखमी आणि आजारी पडण्याचा अनर्थ झाला. या दुर्घटनेबाबत १८ एप्रिल सोहळ्याच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार ‘आप-महाराष्ट्र'तर्फे खारघर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली. पण, खारघर पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नसल्यामुळे ‘आप'तर्फे खारघर पोलीस स्टेशनला स्मरणपत्रेही देण्यात आली. तरी सुध्दा, खारघर पोलिसांकडून काहीच कृती न झाल्याने ‘आप-महाराष्ट्र'तर्फे २४ एप्रिल रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना भेटून त्यांना निवेदन देण्यात आले. पण, त्यानंतरही गुन्हा दाखल करण्यासंदर्भात काहीच कृती न झाल्याने, ‘आप-महाराष्ट्र'चे नेते धनंजय शिंदे यांनी नाईलाजास्तव पनवेल न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात ‘आप-महाराष्ट्र'तर्फे राज्याचे मुख्य सचिव, सांस्कृतिक विभाग, नवी मुंबई पोलीस आयुवत, खारघर पोलीस ठाणे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
त्यानुसार पनवेल कोर्टात केस दाखल होऊन ३ मे आणि २६ मे रोजी सुनावणी झाली. खारघर मधील सदर दुर्देवी घटनेबाबत ठोस कृती न करता राज्य सरकार एक सदस्यीय कमिटी नेमणे वैगेरे वेळकाढू उपाय अवलंबित आहे. त्यामुळे सरकार सदरची दुःखदायक घटना विशष गांभीर्याने घेत नसल्याचे ‘आप'तर्फे सांगण्यात आले.
‘आप-महाराष्ट्र'च्या वतीने दाखल करण्यात आलेल्या अर्जातील मुद्देः
देशाचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाला सरकारी तिजोरीतून अंदाजे १३ कोटी रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे.
हवामान खात्यातर्फे देण्यात येणाऱ्या सुचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत ४३ अंश कडक उन्हात लाखो लोकांना सदर सोहळ्यासाठी बसविण्यात आले. सदर सोहळा केवळ राजकीय फायद्यासाठी, अत्यंत बेजबाबदारपणे, पेंडॉल, प्रथमोपचार, पिण्याच्या पाण्याच्या योग्य सोयी शिवाय आयोजित करण्यात आला.
सरकार तर्फे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा लपवून जबाबदारी झटकण्यासाठी असंवेदनशील विधाने करण्यात आली. मृतांचे पोस्टमॉर्टेम करण्यात सुध्दा हलगर्जी करण्यात आली.