उद्यानाच्या भूखंड विक्रीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
इंदिरानगर मधील सर्वपक्षीय लढ्याला यश
वाशी : तुर्भे इंदिरानगर मधील उद्यानाचा भूखंड नवी मुंबई महापालिकेच्या संमती शिवाय ‘एमआयडीसी'ने परस्पर एका कंपनीला विकला होता. त्यामुळे सदर उद्यान कायम रहावे म्हणून येथील स्थानिकांनी सर्वपक्षीय लढा उभारला होता. अखेर या लढ्यास यश आले असून भूखंड विक्रीच्या सदर व्यवहाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती स्थगिती आदेश दिले आहेत.
एमआयडीसी मधील तुर्भे नोड येथे इंदिरानगर झोपडपट्टी वसलेली आहे. याच ठिकाणी असलेला भूखंड क्र.ओ-एस ७ ‘एमआयडीसी'ने १९९७ साली नवी मुंबई महापालिकेला भाडेतत्वावर दिला होता. यानंतर महापालिकेने परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार सदर भूखंडावर लाखो रुपये खर्च करुन उद्यान विकसीत केले होते. शिवाय सदर ठिकाणी लहानमुलांसाठी खेळण्याचे साहित्य बसवण्यात आले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात ‘एमआयडीसी'ने सदर भूखंड भाकरे ब्रदर्स यांना विकला आहे. भूखंड खरेदीचा व्यवहार होताच सदर विकासकाने भूखंडाचा तात्काळ ताबा घ्ोत उद्यानातील वृक्ष, लावण्यात आलेली खेळणी तोडत आपले काम सुरु केले.
या विरोधात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपशहरप्रमुख महेश कोटीवाले यांनी आक्षेप घ्ोत आंदोलन केले. यानंतर परिसरातील सर्वच राजकीय पक्षांनी आणि नागरिकांनी एकत्र येत उद्यान भूखंड विक्री विरोधात लढा सुरु केला. याबाबत शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्यान भूखंड विक्रीला स्थगिती द्यावी, अशी विनंती करणारे पत्र दिले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच निर्णय दिला असून उद्यान विक्री व्यवहाराला स्थगिती देण्यात आली आहे.
उद्यान बचाव समिती निर्माण करुन सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत सदर ठिकाणी उद्यान वाचवण्यासाठी लढा सुरु केला. सर्व राजकीय पक्षाच्या पाठपुराव्याला तसेच नागरिकांच्या प्रयत्नामुळे अखेर कै.शांताबाई सुतार उद्यान भूखंड क्र.ओ-एस ७ भूखंड विक्रीला स्थगिती देण्यात आली. - महेश कोटीवाले, उपशहरप्रमुख-शिवसेना.