शाळेत घोषणाबाजी; सेंट लॉरेन्स हायस्कूल मधील ६ विद्यार्थ्यांचे निलंबन?

वाशीतील सेंट लॉरेन्स या इंग्रजी माध्यमाच्या  शाळेतून सहा मुलांना काढल्या विरोधात मनसे  आक्रमक

वाशी : वाशी मधील एसएससी-एचएससी बोर्डाच्या कार्यालयासमोर असलेल्या सेंट लॉरेन्स हायस्कूल  या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत काही विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम'च्या घोषणा दिल्याने त्यांना काढून टाकण्यात आल्याचा दावा करीत ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'च्या वतीने १४ जून रोजी सकाळी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. त्यावर विद्यार्थ्यांना घेण्यास शाळेने सकारात्मक भूमिका घेतली; मात्र पालकांनी लेखी माफी मागितली पहिले, असा पवित्रा शाळेने घेतल्याचे ‘मनविसे'च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

वाशी मधील सेंट लॉरेन्स शाळेत १२ जून रोजी मधल्या सुट्टीत शाळेतील स्वच्छतागृहा बाहेर सहज गप्पा मारत असताना विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम' म्हणून घोषणा दिल्या. सदर सर्व विद्यार्थी दहावीची आहेत. एकाने घोषणा दिली म्हणून इतरांनीही त्याची री ओढत घोषणा दिल्या. या घोषणा ऐकताच शाळेतील शिक्षकांनी त्यांना दरडावले आणि त्यातील सहा विद्यार्थ्यांना थेट शाळेतून काढून टाकले. सुरुवातीला मुलांच्या भवितव्याचा विचार करत याबाबत कोणीच पालक पूर्ण माहिती देण्यास तयार नव्हते. यानंतर सदर बाब ‘मनविसे'च्या पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी त्याची दखल घेत १४ जून रोजी सकाळी सेंट लॉरेन्स शाळेसमोर ‘जय श्रीराम'च्या घोषणा देत आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने ‘मनविसे'च्या शिष्टमंडळासोबत शाळा प्रशासनासोबत चर्चा केली.

शाळेत विद्यार्थी खूप आरडा-ओरडा करीत होते. म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली आहे. ‘जय श्रीराम'च्या घोषणा शाळेत आम्ही कोणीही ऐकल्या नाहीत. विद्यार्थ्यांना काढून टाकण्यात आले नाही, तर त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. शाळेच्या शिस्तीनुसार सदरची कारवाई झाली असून पालकांशी चर्चा सुरु आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. काही गैरसमज झाला असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत, असे लेखी आश्वासन यावेळी ‘सेंट लॉरेन्स हायस्वुÀल'च्या मुख्याध्यापिका सायरा कॅनडी यांनी ‘मनसे'च्या शिष्टमंडळाला दिले.

वाशी येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल  मधील ६ विद्यार्थांना ‘जय श्रीराम'च्या घोषणा दिल्याबद्दल शाळेतून निलंबित केल्याबाबत  भारतीय जनता पक्ष, सकल हिंदू समाज, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी त्यांनी शाळेच्या प्राचार्यांची भेट घेवून निवेदन दिले. त्यावर प्राचार्यांनी सदर विद्यार्थांचे निलंबन आम्ही करणार नाही, असे आश्वासन दिले. परंतु, जर विद्यार्थ्यांसोबत अन्याय झाल्यास किंवा विद्यार्थ्यांना शाळेतून काढल्यास भारतीय जनता पक्ष, सकल हिंदू समाज आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनांचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन करु, असा इशारा स्थानिक भाजपा पदाधिकारी विजय वाळुंज यांनी शाळा प्रशासनाला दिला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

संवादातून ‘आप'च्या दिल्ली, पंजाब मधील अतिउत्कृष्ट कामांचा प्रचार