देशाला वास्तव शोधण्याची गरज!
जगात नवनवीन आजार येत आहेत. ज्याच्यावर उपचार होऊ शकत नाहीत. माणसांना योग्य व रास्त दरात उपचार होत नाहीत. त्यात सकस आहाराची कमतरता भासत आहे. बेरोजगारीमुळे आवक कमी व खर्च जास्त ही अवस्था आहे. लोकांच्या गरजा वाढू लागल्या आहेत. मात्र त्या सोडवण्याची ना ब्यूरोक्रसीला.. ना सरकारला निकड वाटत आहे. मात्र लोकांना भूलभूलैयात अडकवण्याचे षडयंत्र आखले जात आहे.
महाराष्ट्रासह झारखंडच्या विधानसभांच्या निवडणूका संपन्न झाल्या आहेत. लोकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. पण, गत सर्व निवडणूकात आणि या निवडणूकीतील प्रचारात व विचारात आमुलाग्र बदल दिसून येत आहे. प्रत्येक निवडणूकीत सर्व पक्षाचे नेते, आपण केलेल्या कामाच्या जिवावर मते मागत, पण या निवडणूकीत विचारधारेपेक्षा, केलेल्या कामापेक्षा, जाती-धर्म आणि भेदभाव यावरच नेत्यांचा आणि पक्षाचा भर राहिलेला आहे.
आजवर कधी धर्म वा जाती कधी संकटात आल्या नव्हत्या. पण, देशात हिंदुत्ववाद्याचे सरकार आहे. देशात बहुसंख्य लोक हिंदूच आहेत. तरीही हिंदू धर्म संकटात कसा? जेव्हा राज्यकर्त्याकडे आपण केलेल्या कामाचा, देशहितसाठी राबवलेल्या योजनांचा ठाव-ठिकाणा नसतो तेव्हा ते असल्या घोषणांचा आधार घेतात, जनतेला संभ्रमात टाकणाऱ्या गोष्टी करतात तेव्हा समजावे ते स्वतःच धोवयात आहेत, असुरक्षित आहेत. तेव्हा ही मंडळी जाती-धर्माचा आधार घेतात.
आपल्या देशात मान्यता आहे की, पुरुषार्थासाठी अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष या गोष्टींची गरज असते. धर्माची यात्रा तेव्हा सुरू होते. जेव्हा पैसा आणि संभोग यांची यात्रा निरर्थक वाटू लागते. म्हणजे या जगात दोन यात्रा आहेत. अर्थ आणि काम, अर्थ म्हणजे पैसा, साधन आहेत आणि काम साध्य आहे. दुसरी यात्रा धर्म आणि मोक्ष आहे. धर्म साधन आहे तर मोक्ष साध्य आहे. म्हणून ज्यांना मोक्ष हवा असेल, त्यांनी धर्म मिळविला पाहिजे. आपला भारत देश केवळ एका भूगोल किंवा इतिहासाचा भाग नाहिये, तो केवळ एका जमिनीचा तुकडा सुद्धा नाहिये. भारतात या शिवायही बरेच काही आहे. भारताची जमीन एका खास तरंगानी संवेदनशील आहे. अशी जमीन जगात कोठेही नाही.
अशी स्पंदने फवत भारतातच आहेत, वातावरणात त्यांचा परिणाम अजूनही अस्तित्वात आहे. भारताने सत्याच्या शोधासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. भारतात खूप मोठमोठे तत्वज्ञानी निर्माण झाले आहेत. पण, जगातील लोकांना तसे वाटत नाही. भारताचा शोध जेव्हा लागला तेव्हा परदेशी लोकांना तो इतरांपेक्षा वेगळा वाटला. कारण दुसऱ्या जगातील लोकांना सत्यावर विचार आणि चिंतन हे निरर्थक आहे.
पण, सत्य पाहता येते ते विचार करण्याने कळत नाही. प्रकाशाला पाहता येऊ शकते, विचार करता येऊ शकत नाही. पण, भारतातील लोकांनी सत्याच्या शोधाला ‘दर्शन' हे नाव दिलेले आहे. दर्शनाचा अर्थ ‘पाहणे' असा आहे. संपूर्ण जगात भारतच एक अशी भूमी आहे, ज्याने अद्भूत रूपाने सत्य जाणण्याचा प्रयत्नात एकाग्र केले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास गणिताची आधारशिला भारतात ठेवण्यात आली होती. स्वतःला जाणणे हेच भारताचे लक्ष्य होते. दहा हजार वर्षापासून लाखो, कोट्यावधी लोक सतत प्रयत्न करत राहिले. त्यामागे त्यांनी आपले सर्व काही बलिदान केले. विज्ञानाची त्याच्या विस्ताराची स्विकृती केली, त्याचप्रमाणे समृद्धी, दारिद्रय, आजारपण आणि मृत्यूचा सुध्दा स्वीकार केला, पण सत्याचा शोध घेणे त्यांनी सोडले नाही.
जगातील कोणत्याही देशात गौतम बुद्ध, महावीर नेमीनाथ, आदिनाथ, कबीर, राम, ज्ञानेश्वर, फरीद किंवा दादूृ, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर ते संत तुकाराम जन्माला घातले नाहीत. त्यांनी मोठे वैज्ञानिक, कवी, कलाकार वा चित्रकार यांना जन्म दिला. पण, रहस्यदर्शी त्रषी-मुनी केवळ भारतातच जन्माला आले. हे त्रषी मूनी दिव्यतेचे माध्यम आहेत. ‘इथे हजारो वर्षापासून लाखो लोकांनी आपल्या मनमंदिरांची दारे उघडली आहेत. भारत जरी हीन दीन असला तरी त्याचा आध्यात्मिक वारसा इतका समृद्ध आहे की, पहाणाऱ्याला नवल वाटेल.
जगातील सर्व देश इतर बाबींमध्ये व्यस्त होते. पण, भारत मनुष्याच्या चेतनेकडे लक्ष केंद्रित करत होता. जिथे परमात्मा मनुष्याच्या जवळ येईल. परमात्म्याला जवळ आणणे हे एकट्याचे काम नाही, ही हजारो वर्षाची अनेकांची साधना आहे, किंवा ती योगायोगाची गोष्टही नाही. जेव्हा कुणाला सत्याच्या शोधाची लालसा असते तेव्हा तो यात्रेला निघतो असाच पायथागोरस २५०० वर्षापूर्वी भारतात आला होता. स्वतः ईसा मसीह सुध्दा भारतात आले होते. तेव्हा बुध्द हेच त्यांचे जवळपास सर्व जीवन होते. तेव्हा बौद्धधर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. पण बुद्धाचा मृत्यू झाला होता. जीजस यांनी भारतातच अध्यात्म, ब्रह्म आणि परमात्मा विषयी ज्ञान आत्मसात केले होते.
तीच परंपरा आजतागायत सुरू आहे. अनेकजण सत्याचा शोध घेण्यासाठी धडपडत आहेत. पण, त्यांना तो शोध घेता येत नाही, कारण त्यांची वाटचाल योग्य दिशेने जात नाही. सध्य स्थितीतील साधू, संत फवत भगवी वस्त्रे परिधान करून वावरतांना दिसतात. त्यांचे लक्ष फवत अर्थ आणि काम यावरच असते. त्याचाच परिणाम आज असे अनेक तथाकथित संत विविध कारागृहात कैदेत खितपत पडलेले आहेत. त्यांची सुटका होण्याची चिन्हे नाहीत. अशाच लोकांचे भवतदेखील सत्यापेक्षा अंधभवतीत लीन आहेत. राजकारणातील अनेक तथाकथित नेतेही त्यांचे लाडके भवत आहेत. तेही आपल्या गुरूच्याच पावलावर पाऊल टाकत चालले आहेत. एवढचं नव्हे, तर अनेक तथाकथित संत म्हणवणारे आपला संत धर्म सोडून राजकारण धर्म स्विकारत आहेत. आजच्या बरबटलेल्या नेत्यांकडून मिळणाऱ्या पैशावर व समर्थनावर वाहवत चालले आहेत.
वस्तूस्थितीच्या सत्याचा शोध विसरत चालले आहेत. देशात प्रचंड महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. गोरगरीबांसह सामान्य मध्यमवर्गीयांचे जगणे मुश्किल झाले आहे. हे सत्य असतांना, त्याकडे या मंडळीचे लक्ष नाही. मात्र सरकारच्या वरकरणी दिखावू घोषणाच्या समर्थनार्थ काही मंडळी उतरत आहेत.
लोकसभा निवडणूक काळात मध्यप्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ‘लाडली बहन' योजना घोषित करून महिलांना (मोजवयाच) १५०० रूपयाचे आमिष दाखवले. या घोषणेला बऱ्याच महिला बळी पडल्या ज्यांना पैसे मिळाले, त्या खुश तर ज्यांना पैसे मिळाले नाही, त्यांना पैसे मिळण्याची आशा वाटल्याने त्यांनी तत्कालीन सरकारला मते देऊन सत्तेवर आणले, पण तेथील नवीन मुख्यमंत्र्यांनी ती योजना रद्द करून टाकली. ‘तेल गेले, तूप गेले हाती धुपाटणे आले'
मोदी सरकारने उज्वला योजना राबवून अनेक गोरगरीब महिलांना ‘गॅस सिलिंडर' मोफत दिले. पुढे त्या गॅसच्या किंमती एवढ्या वाढवल्या की, गॅस सिलिंडर रिफिल करणे अवघड झाले. आज अनेक घरात परत चुलीवर लाकडे वापरण्याची वेळ आली आहे. तरीही काही अंधभवत म्हणतात विकास झाला. आताचे राजकारण तर विचार करण्यापलिकडे गेले आहे. राजकारणी व सरकारी नोकरशाही जनतेला लुटण्यास आपले कर्तव्य मानू लागली आहे. हे आजचे सत्य आहे.
लोकांच्या गरजा वाढू लागल्या आहेत. मात्र त्या सोडवण्याची ना ब्यूरोक्रसीला ना सरकारला निकड वाटत आहे. मात्र लोकांना भूलभूलैयात अडकवण्याचे षडयंत्र सरकारकडे नवकीच आहे, ते म्हणजे रोज एक नवीन योजना पुढील काळासाठी जाहिर करायची व लोकांना आशेवर ठेवायचे. जसे की, महिलांना राजकारणासह सर्वच क्षेत्रात ५०% आरक्षण देण्यात येईल. योजना मंजूर पण तिची अंमलबजावणी पुढील १० वर्षानी केली जाईल, किंवा २०४७ साली भारत जगातील सर्वोकृष्ट देश असेल, त्याची अर्थव्यवस्था जगात १ नंबरची असेल!
खरंतर आज जगातील सर्वांचीच अवस्था अशी आहे की, आपण उद्याचा दिवस पाहू का? जगात नवनवीन आजार येत आहेत. ज्याच्यावर उपचार होऊ शकत नाहीत. माणसांना योग्य व रास्त दरात उपचार होत नाहीत. त्यात सकस आहाराची कमतरता भासत आहे. बेरोजगारीमुळे आवक कमी व खर्च जास्त ही अवस्था आहे. तरीही सरकार म्हणते देशाचा विकास होत आहे. हा विकास म्हणजे शेत विकून बंगला बांधणे व गाडी घेण्यासारखा विकास आहे. दागिने विकून ‘मेकप'चे सामान खरेदी करून आपला लूक बदलण्यासारखा आहे. आज देशातील प्रत्येक नागरिकांवर किमान दोन अडीच लाखाचे कर्ज आहे. प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्ष हे आहेच. या कर्जाची आपण परतफेड करणार कसे?
सरकारचे काय, सरकारे येतात, सरकारे जातात, पण, सामान्य माणसाचे जीवन रडगाणे कधी संपलेले नाही व संपणारही नाही. म्हणून कधी नव्हे एवढा आजचा माणूस देव धर्म व बाबा लोकांच्या सानिध्याला जवळ करू पहात आहे. पण, या स्थितीत ना देव जवळ येत आहे ना बाबा लोक त्यांची समस्या दूर करत. देवाचे काय, तो किमान जगण्याची आस तरी देतो, पण हे बाबा लोक व तथाकथित राजकारणी लोकांची जगण्याची आशाही हिरावून घेत आहेत. लोकांना सत्यापासून दूर लोटत आहेत. म्हणून आता कोणताही चमत्कार होणार नाही. त्यासाठी व्यवस्थेची गरज आहे. - भिमराव गांधले