मधुर दंश
प्रेम मधुरता देऊ शकते. नात्यांचा सुंदर गुंता आणि विरहाची डंख मारणारी वेदना असते किंवा कधी दुखद असते. त्यात फसवणूकसुद्धा असते. पण हे मधुर प्रेम हे धनुष्यबाणासम जखम देत राहते. बऱ्याच नातेसंबंधांमध्ये मधुर दंश तर असतो.
मधुर असा वाटणारा दंश, आवडणारी वेदना, प्रेम, त्याला मधुर दंश अशा अर्थाने मधुर दंश हे शीर्षक मी वापरले आहे. असे म्हणतात...प्रेमाचा दंश, चावा, बोचणी, घावसुद्धा गोड असतो, पण तो दुखावतो. प्रेमसुद्धा दुखावते आणि सुखावते. शक्ती देऊ शकत असते. तो प्रेम दंश कुठेतरी टोचतपण राहतो.
मधुर दंश नावाची माझी एक कथा, कथा संग्रहात २०१२ साली प्रकाशित झाली होती. त्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशनाने काढली आणि त्यावरून मला पोस्टाने आज पत्र आलं. त्यात वाचकाने असे लिहिले की, ”ज्ञानेश्वरी तुम्ही वाचली आहे का? ज्ञानेश्वरीच्या एका अध्यायात असे दिले आहे की माणसाने कशातच गुंतू नये.” याबद्दल त्या वाचकाने ज्ञानेश्वरीचा अध्याय सुद्धा मला पाठवला. लिहीले आहे...”देव ईच्छा आणि त्यानुसार मुलं होतात. आपण त्यांना जन्माला घालायचं असतं; पण त्यांच्यामध्ये गुंतायचं नसतं.” मग नेहमीची आपली उपमा, उत्प्रेक्षा देऊन की मानवाने, अलिप्तासारखं कमल फुलासारखं चिखलात रुतूनही अलग रहावे वगैरे वगैरे! लिहीले.
जिव्हाळ्याचा विषय आहे. पण अलिप्तता हे शक्य आहे का? आपण सगळी माणसं असतो आणि आपल्या मुलांवर/अपत्यावर प्रेम करणं आपला स्थायीभाव असतो. मानवाचा काय, सर्व सजीवांचा अपत्याच्या वाढीत सहभाग असतो. खूप वर्षांपूर्वी ‘एक कहानी' म्हणून मुंबई दूरदर्शनवर छोट्या छोट्या कहाण्या यायच्या. त्याच्यात एक कहानी बघितली होती. आता मला नाव वगैरे काहीच आठवत नाही. त्यात कॉलेजची मुलं असा खेळ खेळत असतात की, बुटाच्या आवाजावरुन कोण, जिना चढून येते आहे ओळखायचं आणि त्यावेळी फाटक्या बुटाचा, श्रावणचा आवाज येतो.
”कॉलेजचा रामा शिपाई असेल” असं म्हणून सगळेजण जोरात हसतात. प्रत्यक्षात तो बुटांचा आवाज श्रावण या विद्यार्थ्याचा असतो. श्रावण गरीब आई-वडिलांचा मुलगा एकुलता आहे. आई वडिलांनी खूप कष्ट करून त्याला त्या भारी कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असतो आणि जुने बूट घालून तो कॉलेजला आलेला असतो. बाकी अति शहाणे सगळे त्या बुटाच्या आवाजावर हसतात. श्रावण हताश होतो. घरी आई वडिलांवर चिडचिड करतो आणि म्हणतो की ”मला जास्त पैसे पाठवत जा” आईवडील त्याला कर्ज काढून पैसे पाठवतात. कॉलेजच्या जीवनात श्रावणला एक मैत्रीण मिळते आणि त्या मैत्रिणीबरोबर त्याचं प्रेम होतं. ती मैत्रीण तिच्या घरची एकुलती एक असल्यामुळे ते लोकं श्रावणला घर जावई करून घ्यायचे ठरवतात. श्रावण आधीन होतो. आई वडिलांचे पैसे उडवत असतो आणि परदेशी जायचं ठरवतो. आई-वडील म्हणतात, ”अरे आता तरी असे करु नको. आम्हाला वाटलं तू नोकरी करशील येथे आणि आमचं कर्ज फेडशील.” त्यावर तो आई वडिलांना म्हणतो ”तुम्हाला तर जन्मजात कर्ज करण्याची सवय आहे. कर्जात तुम्ही पूर्वीही बुडले होते. माझ्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं वगैरे कारणं सांगू नका आणि मला तुम्ही, दोघेही विमानतळावर सोडायला यायची गरज पण नाही. तुमच्याकडे ढंगाचे कपडे नाही. तुम्ही मला तिथे सोडायला येऊन मला लाज आणाल. घरी जा”
”एवढा टॅक्सीला खर्च कुठे करणार?” वडिल.
”तुम्ही आपले इथूनच, बसने परत जा. टॅक्सी करून जा वाटल्यास, पण परत जा” - श्रावण.
आई वडील एकदम हताश होतात. लेक त्यांना रस्त्यावर उतरवतो. आईने हातात गाठोड धरलेलं असतं आणि ते दोघे चालत आपल्या गावाच्या दिशेने घाम पुसत पुसत चालू लागतात. अशी ती कथा होती.
थोड्याफार फरकाने बऱ्याच घरी बऱ्याच पालकांनी लेकासाठी कर्ज घेतलेल असतं. अपत्याबद्दल पालकांची अशीच कथा असते. माझ्या मधुर दंश कादंबरीत अशी कथा दाखवली आहे. ती अशी की.. मुलाचे पाळणाघरात हाल होतात म्हणून आई नोकरी सोडून देते. वडिलांची नोकरी साधीच असते आणि आईने नोकरी सोडल्यावर आईची इतक्या वर्षाचे प्रॉव्हिडंट फंडाचे वगैरे सगळे पैसे ती संस्था खाऊन टाकते. माणसं साधी आहेत, त्यामुळे गरिबी..त्यामुळे या गावात या लोकांना राहावं लागतं; पण आई बाळ आणि वडील एका खेड्यात एक जमिनीचा तुकडा विकत घेऊन तिथे बंगला बांधून ( बंगला म्हणजे खोपट) आपलं जमेल तसं बांधून राहतात. मुलगा मोठा होतो. बालपणाचे सगळे आनंदाचे दिवस वगैरे जातात आणि झाडंपण खूप सुंदर उगवतात. पण मुलाला परदेशी जायचं म्हणून रुसतो. तर घरात तो अबोला धरू लागतो. भांडण करू लागतो.
”मला पैसे दे आणि परदेशी पाठवा” म्हणतो. त्या वर आईच्या मनात येतं ”तेरी एक हसी के बदले, मेरी ये जमीन लेले, मेरा आसमान लेले” असे मी म्हणायचे. तर खरंच त्या मुलाने माझ्यावर जमीन विकण्याची वेळ आणली. जमीन पेस्तनजी नावाच्या एका पारशी माणसाला विकतात. तो बंगला पाडून तिथे रिसॉर्ट बनवणार असतो. आई वडील परत आपलं गाठोड्यातून सामान बांधून उपनगरातल्या एका छोट्याशा खोलीत भाड्याने राहायला येतात.
प्रेम मधुरता देऊ शकते. नात्यांचा सुंदर गुंता आणि विरहाची डंख मारणारी वेदना असते किंवा कधी दुखद असते. त्यात फसवणूकसुद्धा असते. पण हे मधुर प्रेम हे धनुष्यबाणासम जखम देत राहते. बऱ्याच नातेसंबंधांमध्ये मधुर दंश तर असतो. सुरुवातीला खूप आनंदाचे क्षण, एकत्र घालवलेल्या क्षणांची रंगत, साथ नंतर ब्रेकअप किंवा भांडण किंवा दूर जाणं किंवा वादावादी होऊन दुरावा येतो किंवा घोस्ट होणे, म्हणजे अचानकच नाते संबंध तोडून ती व्यक्ती पाठ फिरवून निघून जाते. अशा वेगवेगळ्या मार्गाने प्रेमाचा मधुर दंश माणूस आयुष्यभर भोगत असतो.
खरे आहे ना! तुमचं काय मत आहे? - शुभांगी पासेबंद