राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात

देशात लोकशाही टिकवण्यासाठी मोदी-शहांना सत्तेतून हद्दपार करा

निर्भय बनो मंचच्या जनसंवाद सभेत वक्त्यांचा नारा 

नवी मुंबई :  सध्या देशात धर्मा -धर्मात तेढ निर्माण करुन ,त्यातुनच दंगली घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कायदा सुव्यवस्था पाहण्यासाठी देवेद्र फडवणीस यांना वेळ नाही. ते पुर्ण वेळ राजकारण करत आहेत. त्यामुळे त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुर्ण वेळ राजकारण मंत्री बनावे असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय व सामाजिक विश्लेषक डॉ. विश्वंभर चौधरी यांनी वाशी येथे केले.  वाशी येथील विष्णुदास भावे नाटÎगृह येथे निर्भय बनो मंच द्वारा आयोजित जनसंवाद सभेमध्ये ते बोलत होते.  

देशात सध्या धार्मिक ध्रुवीकरण सुरू आहे. धर्मा धर्मात तेढ निर्माण करुन जातीय दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुफ्ती मोहम्मद यांच्या बाजुला बसले तर हिंदुत्व धोक्यात आणि हे पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खातात ते कसे चालते. त्यामुळे ते भंपक राष्ट्रवाद आपल्याला शिकवू पाहात आहेत. त्यामुळे आपल्या मुलांचे भवितव्य अधांतरी असणार आहे.  उद्याचा भारत विद्यार्थ्यांना काय देणार असा सवाल करत, राष्ट्रध्वज  आणि राष्ट्रगीताला विरोध करणारे हेगडेवर व गोळवलकर यांची परंपरा आम्हाला नको. आम्हाला गांधी, नेहरू, आंबेडकर, पटेल यांची परंपरा हवी असे सांगत भाजप सरकार विरोधात शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी असल्याने 2024 मध्ये संविधान वाचवण्यासाठी मोदी - शाह यांना सत्तेतून हद्दपार करण्यासाठी एकत्रित आले पाहिजे असे डॉ. विश्वंभर चौधरी यावेळी म्हणाले.

 देशातील मूलभूत प्रश्नांवर बोलत गेल्या 9 वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे मोदी हे एकमेव पंतप्रधान असल्याच ऍड. असीम सरोदे म्हणाले. लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी सारखे वागावे. निर्भय बनो हा लढा व्यक्ती विरोधात नाही, प्रवृत्ती विरोधात आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती याचा कोणताही संबंध नाही. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त  न्यायमूर्ती मिश्रा यांच्या भूमिकेवर प्रहार करताना, चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजविणे बंधनकारक करणारे न्यायमूर्ती न्यायालयाचे कामकाज सुरू होण्याआधी मात्र राष्ट्रगीत वाजविण्याच्या मागणीला विरोध करतात, हीच खरी या देशाची शोकांतिका आहे.  

खरे तर कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे वक्तव्य करणा-या विरोधात पोलिस थेट गुन्हा दाखल करू शकतात. भिडे गुरुजी सारखी मंडळी राष्ट्रध्वजाबद्दल अपमानजनक वक्तव्य करतात. त्याबाबत नागरिकांनी तक्रार करावी असे सांगितले जाते.  

मोदींनी समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात घोषणा केली आहे. निवडणुका तोंडावर आल्या की त्यांना समान नागरी कायद्याची आठवण येते. राज्य घटनेत हिंदू विवाह कायदा अस्तित्वात आहे. हा कायदा लागू करण्याचे राज्यांना अधिकार आहेत गुजरात, राजस्थान आदी राज्यामध्ये भाजपचे सरकार होते, त्याठिकाणी का लागू केला नाहीं. देशात मोदी आणि शहा भीतीचे राजकारण करत असल्याचे सांगत समान नागरी कायद्याला आमचा विरोध नाही. परंतु कायद्यासंदर्भातील भूमिका पहिले स्पष्ट करा असे ऍड. असिम सरोदे यावेळी म्हणाले. याप्रसंगी त्यांनी राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करत आपली भूमिका मांडली.  

यावेळी लेखक तथा सलोखा सहिष्णुता पुरस्कर्ते प्रमोद मुजुमदार यांनी आपल्या भाषणात भारतीय उपखंडाचा 70 हजार वर्षांपासूनचा इतिहास कथन करताना झालेल्या स्थित्यंतरावर भाष्य केले. नवी मुंबईत असलेल्या आगरी-कोळी संस्कृतीचा आपल्या भाषणात त्यांनी उहापोह करताना ही संस्कृती स्वतंत्र कशी होती हे सांगून ब्राह्मणी संस्कारापासून ती खूप दूर होती असे सांगितले. जागतिक संशोधनानुसार महाराष्ट्रातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांची गुणसूत्रे ही समान आहेत. तरीही आपण समाजात जातीभेद धर्मभेद जातीय तंटा निर्माण करतो असे सांगत सलोखा, सहिष्णुता व सर्वधर्मसमभाव जो या देशात मुळातच होता तो टिकवला पाहिजे असे ते म्हणाले.  

निर्भय बनो मंच व नवी मुंबईतील समविचारी संघटनांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद सभेत प्रारंभी प्राध्यापक अजित मगदूम यांनी आपल्या प्रास्ताविकात या जनसभेच्या आयोजनामागचा हेतू विषद केला. तर आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली मगदूम यांनी केले. निर्भय बनो च्या या जनसंवाद सभेस नवी मुंबईतील विचारवंत, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध पक्षातील राजकीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेलमधील विविध पुरोगामी संघटनातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन