सीएसएमटी येथे ‘मडगांव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस'चे स्वागत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मडगांव ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस'ला हिरवा झेंडा

नवी मुंबई ः ‘मडगांव (गोवा)-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस'मुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर-दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २७ जून रोजी सकाळी मडगांव ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस'ला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर सायंकाळी ‘वंदे भारत एक्स्प्रेस'चे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘वंदे भारत एक्स्प्रेस'चे लोको पायलट आणि प्रवाशांशी संवाद साधत त्यांचे मिठाई आणि गुलाबपुष्प देवून स्वागत केले. याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार यामिनी जाधव, ‘मध्य रेल्वे'चे महाप्रबंधक नरेश लालवाणी, मुंबई विभागाचे महाप्रबंधक रजनीश गोयल, आदि उपस्थित होते.

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि पर्यटनात अग्रेसर असलेल्या गोवा या दरम्यान सुरु झालेल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस'मुळे पर्यटनाचा शाश्वत विकास होण्यास आणखी मदत होईल. या गाडीत विविध आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कोकणवासियांचा प्रवास सुलभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

वंदे भारत एक्स्प्रेस देशात निर्मित असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यास मदत करणारी आहे. राज्यात ‘रेल्वे'च्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने १३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह १२३ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. राज्यातील बुलेट ट्रेनसह अन्य रेल्वे प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारच्या सहाय्याने प्रयत्न सुरु आहेत. बुलेट ट्रेनकरिता भूसंपादनाचे काम सुरु आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आरटीई अंतर्गत शाळांचे १८०० कोटींचे शैक्षणिक शुल्क शासनाकडे प्रलंबित