नानाची डबल ढोलकी...

नानाची डबल ढोलकी...

ब्रिजभूषण नावाचा भाजपचा पशू खासदार कुस्तीगीर महिलांचं शोषण करतो; नानाला याचं काहीच वाटत नाही. संसदेच्या सुरक्षेचा जाब विचारला म्हणून १४६ खासदारांना निलंबित केलं जातं तरी नाना मौनी. खोट्यानाट्या केसेस तयार करून विरोधकांना तुरूंगात पाठवण्याचा हातखंडा दिवसाढवळ्या सुरू असतानाही नाना चिडीचुप्प. ज्याच्याकडून कान पिळण्याची अपेक्षा तोच असा मौनीबाबा बनला तर सामान्यांनाही नानाकडून अपेक्षा ठेवण्याचं कारण नाही. कलेतून व्यक्त झालेला नाना आणि वास्तवातील नाना यातील फरक आता लोकांना कळू लागला आहे.

 चरित्र अभिनेता नाना पाटेकर सध्या बराच मोकळा आहे. कलेतली आपली अदाकारी सादर करता करता तो आता देशाच्या भवितव्याविषयीच्या गप्पा मारण्यासाठी मोकळा आहे. गेल्या आठवड्यात त्याने देशाच्या राजवटीविषयी टिपण्णी केली आणि २०२४ च्या निवडणुकीतही भाजपच बाजी मारेल, अशी भविष्यवाणी त्याने वर्तवली. तेव्हा खऱ्या नानाचे हे बोल नाहीत, असं सहज वाटून गेलं. थेट आणि भडक स्वभावाचा हा अभिनेता विद्यमान सत्तेविषयी खरं बोलत नाही, हे पाहून देशवासीयांनाच नानाचा मत्सर येईल. इंडिया टुडेच्या राहुल कनवल याला दिलेल्या मुलाखतीत आगामी सत्तेचं हे भविष्य त्याने वर्तवलंय. ही भविष्यवाणी सांगण्यासाठी नानाने बापुडे शब्द वाया घालवण्याची खरी तर काहीही आवश्यकता नव्हती. सामान्य माणसाच्या सुख दुःखाशी ज्यांचं काही देणंघेणं नाही, अशा ऐशाराम्यांना भाजपचीच सत्ता राहावी, असं वाटू शकतं. ते त्यांचं वैयक्तिक मत होय. नानासारख्या कलावंताने हे मत व्यक्त करताना हजारदा विचार करायला हवा होता. देशाला भाजपशिवाय पर्याय नाही, असं सांगताना नानाला पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान हवे आहेत. तो केवळ सत्तेचीच चर्चा करत राहिला नाही तर भाजपच्या वाट्याला किती जागा येतील, हेही तो ठामपणे सांगतो. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांना मिळालेल्या जनाधाराप्रमाणे हे यश असेल, असं सांगणाऱ्या नानाने ३७५ ते ४०० चा आकडाही जाहीर करून टाकला. म्हणजे पुढील निवडणुकीत विरोधकांचे ८८ जणच असतील, असं हे भाकित.

भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असं नानाने सांगण्याची काहीही आवश्यकता नाही. ते तर सत्तेसाठी लाचार झालेले आणि सत्तेने विकत घेतलेल्या वाहिन्यांवरून धाय मोकलून सांगितलं जातच आहे. भक्तांनी तर कमरेचं सोडण्याचं तेवढं शिल्लक ठेवलंय. तेव्हा भाजप समर्थक बनलेल्या नानाने हे सांगण्याची आवश्यकता नव्हती. भाजपची सत्ता आणि सत्तेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही देशात सुरू असलेल्या चांगल्या कामाची परिणती असल्याचं नाना सांगतो. नानाचं भाजप प्रेम आजचं नाही. तो मुळचा शिवसैनिक. सैनिक असल्यापासून नानाने भाजपला कधीच दुखावलेलं नाही. बाळासाहेब गेल्यानंतर म्हणे आपला मातोश्रीशी संबंध संपला असं सांगणाऱ्या नानाने बाळासाहेबांच्या जाण्यानंतर भाजपने सेनेच्या केलेल्या अवस्थेविषयी त्या पक्षाच्या नेत्यांचे कधी कान उपटल्याचं पाहायला मिळालं नाही. युतीच्या सत्तेत भाजपने शिवसेनेची केलेली वाताहत कोणीही विसरू शकत नाही. तरीही नाना एका शब्दात बोलला नाही. मुळात गूण वशिल्याचे  असल्याने भाजपच्या नटखटांना दोन शब्द सुनावण्याची अपेक्षा नानाकडून करणंही बालिशपणाचंच होय. स्वतःला सेनेचा कडवा सैनिक म्हणणारा नाना, बाळासाहेबांविषयी प्रचंड प्रेम व्यक्त करणारा नाना बाळासाहेबांच्या जाण्यानंतर त्यांनी उभारलेल्या सेनेला पारखा ठरवतो, हे म्हणजे काम भागलं की जन्मदात्याच्या लाथ घालण्यासारखं नाही काय? बाळासाहेब गेल्यानंतर ‘मातोश्री' चा संपर्क संपला असं सांगणाऱ्या नानाचे उध्दव आणि राज यांचे कान ओढण्याचे अधिकार कोणी हिरावले? शिवसेनेत पडलेल्या फुटीविषयी तर हा माजी शिवसैनिक काहीच का बोलला नाही? सेनेवर कायम टीका करणाऱ्यांनाही या फुटीची घृणा वाटली. यानंतर या टीकाकारांनी उध्दव ठाकरे यांचं जाहीर समर्थन करत फुटीरांना चार शब्द सुनावले. सामान्य माणसाला या फुटीबाबत काय वाटतं याचाही विचार नानातल्या या सैनिकाने केला नाही. ज्यांनी हे सारं केलं ते कोण होते? यामागे त्यांची मानसिकता काय होती? याचाही विचार नानाच्या डोक्यात आला नाही? ज्याला दैवत मानतो त्या बाळासाहेबांच्या मुलाला सत्तेवरून पायउतार करणाऱ्यांना नानाचा हजरजबाबीपणा काही सुनावेल, असं वाटत होतं. त्याने ‘तुमच्या भांडणात आम्हाला रस नाही,' असं सांगून आपला हेतू दाखवून दिला. आताही तो तेच बोलतोय. ‘तुमच्या भांडणाने आमच्या घरातली भांडणं का म्हणून वाढवायची?' हा त्याचा प्रश्न इरसालच म्हटला पाहिजे. असले प्रश्न कंगना रणावत, महेश मांजरेकर, सुमित राघवन, विवेक अग्नीहोत्री या भाजपच्या कळपातल्या कलाकारांनी यांनी केले असते तर समजू शकतो. या कलाकारांची चाकरी ही भाजपसाठी रतीब मानली जाते. प्रामाणिक व्यक्त होणाऱ्या कलाकारावर टीका करण्यासाठी असल्याच मंडळींचा भाजप वापर करून घेत असतो. नानाचं तसं नाही तरी तो असा वाहत गेला, याचं नवल वाटतं. एका मुलाखतीत त्याने ‘नाम' या आपल्या बहुचर्चित संस्थेत अडथळा नको, असं म्हटल्याचं ऐकायला मिळालं. ‘नाम' विषयी कोणाच्याही मनात किंतू, परंतु नाही. कोणीही त्यात सहभाग घ्यावा, असंच हे काम. हे काम निस्सीम आहे. ग्रामीण भागातील पाण्याचा यक्ष प्रश्न सोडवण्याचा त्यामागे उदात्त हेतू आहे. असं असताना त्यात अडचण आणण्याची हिंमत सत्तेत होऊच कशी शकते? नानाला तो न मानणाऱ्या काँग्रेसच्या राजवटीवेळीही  अशा याचना कराव्या लागल्याचं ऐकिवात नाही. मग या सत्तेला इतकं घाबरण्याचं कारण काय? नानाची ही सल समजून घेण्यासारखी आहे. भाजपच्या सत्तेने देशातील विरोधकांच्या मुस्कटदाबीचा सुरू केलेला खेळ नानाच्या समोर असावा. भ्रष्टाचाराचा संबंध नसलेल्यांनाही वर्षं, दीड वर्षं तुरुंगात काढावी लागल्याचं नाना पाहातोच आहे. असल्या सत्तेपुढे लाचार बनलेल्यांची मांजर झालेल्याही लोकांनी पाहिल्यात. तेव्हा उगाच शेपटीवर पाय नको, असा नानाचा कल असावा.  

ज्या माणसाला नोटबंदी हा मोदींचा निर्णय योग्य वाटतो, तो एक तर अज्ञानात वावरत असावा वा सत्तेचा ठार अंध झालेला असावा. नानाची स्थिती यातलीच. तो कौतुक करतो त्या नोटबंदीने शेकडोंचे प्राण गेले, ही बाब नाना क्षुल्लक समजत असेल तर नाना भ्रमिष्ठीत गेलाय असंच कोणी म्हणेल. नोटबंदीसाठी मोदींनी सांगितलेली एकही गोष्ट खरी ठरली नाही. काळा पैसा बाहेर आला नाही की अतिरेकी कारवाया थांबल्या नाहीत. २०१४ नंतर भ्रष्टाचाराने तर देशाचा क्रमांक जगात पहिल्या दहामध्ये नेऊन ठेवला आहे. महागाईने तर सामान्यांचं कंबरडं मोडलंय. उद्योग रसातळाला गेले आणि नोकऱ्याही गेल्या. अशावेळी सारासार विचार न करणारीच व्यक्ती नोटबंदीचं कौतुक करेल.
ज्या मोदींचं नाना कौतुक करतो, त्या मोदींच्याच सत्ता काळात २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर पुलवामाचा हादसा घडला. ४० जवान हकनाक जिवाला मुकले. यातला मोदींचा आणि त्यांच्या सत्तेचा खोटेपणा जम्मूच्या राज्यपालानेच उघड केला. तरीही याची साधी चौकशी झाली नाही. नानाला याचं काहीच वाटलं नाही. पठाणकोटला हल्ला झाला. पाकिस्तानी आयएसआयवर आक्षेप नोंदवला गेला त्याच आयएसआयच्या अधिकाऱ्यांना हल्ल्याच्या ठिकाणी पाचारण केलं. चौकशी संपली नाना काहीच बोलला नाही. ज्या उद्योगांच्या जोरावर महाराष्ट्राचा गाडा यथासांग चालला त्यातले अनेक उद्योग मोदी सरकारने गुजरातमध्ये रवाना केले तरी नाना एका शब्दाने बोलला नाही. राज्याला उपयोग नसलेल्या बुलेट ट्रेनच्या हट्टापायी महाराष्ट्राला ७५ हजार कोटींचा भूर्दंड बसत असल्याचं नानाला माहितीच नाही. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे कायदे मागे घेण्यासाठी देशातला शेतकरी वर्षभर आंदोलन करत राहिला. या आंदोलनात ७४५ शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले हे नानाच्या लक्षातच आलं नाही. तो एक ब्र ही बोलला नाही. हाथरसच्या घटनेत एका १९ वर्षांच्या दलित बालिकेवर भाजपच्या नराधमांनी गँगरेप केला. सारा देश सुन्न झाला, पण नानाच्या गावातच नव्हतं. जम्मूच्या कठूआत शेळ्या राखणाऱ्या एका बालिकेवर भर मंदिरात बलात्कार होतो, बलात्काऱ्यांच्या सुटकेसाठी काळ्या डगल्यातील कथित वकील रस्त्यावर उतरले जातात, देश हादरतो, तरी नानाला पत्ता नसतो. ब्रिजभूषण नावाचा भाजपचा पशू खासदार देशाचं नाव उज्वल करणाऱ्या कुस्तीगीर महिलांचं शोषण करतो, त्याचा निषेध भर दिल्लीत होतो; नानाला याचं काहीच वाटत नाही. संसदेच्या सुरक्षेचा जाब विचारला म्हणून १४६ खासदारांना निलंबित केलं जातं तरी नाना मौनी. खोट्यानाट्या केसेस तयार करून विरोधकांना तुरूंगात पाठवण्याचा हातखंडा दिवसाढवळ्या सुरू असतानाही नाना चिडीचुप्प. ज्याच्याकडून कान पिळण्याची अपेक्षा तोच असा मौनीबाबा बनला तर सामान्यांनाही नानाकडून अपेक्षा ठेवण्याचं कारण  नाही. कलेतून व्यक्त झालेला नाना आणि वास्तवातील नाना यातील फरक आता लोकांना कळू लागला आहे. कोणीतरी म्हटलंय ‘कलाकार म्हणून तू थोर आहेस, पण माणूस म्हणून तू भिकारडा आहेस' याची प्रचिती नानाने टाळायला हवी. दृष्टी असताना इतकं आंधळं होणं म्हणजे आपलं स्वत्व विकण्यासारखं आहे. नाना ते यथासांग पार पाडतो आहे, याचं दुःख आहे. - प्रविण पुराे

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

देवभोळा समाज आणि प्रवचनकार, महाराज