देवभोळा समाज आणि प्रवचनकार, महाराज

 देवभोळा समाज आणि प्रवचनकार, महाराज

   भारतभरात शहरांसह ग्रामीण भागात सध्या वेगवेगळ्या स्वामी, महाराज, प्रवचनकार यांचे प्रवचनाचे आणि प्रबोधनाचे कार्यक्रम सुरु आहेत. जे ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने भक्तगण एकवटत आहेत. डिसेंबर-जानेवारी मासात उन्हाचा त्रास आणि पाऊस येण्याची भीती नसल्याने या काळात ठिकठिकाणी प्रवचनांचे कार्यक्रम घेतले जातात. स्थानिक राजकीय पुढारी, उद्योगपती किंवा संप्रदाय यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

 भारतभूमी ही देवभूमी आहे, इथे रामायण, महाभारत घडले. भक्तांच्या रक्षणासाठी आणि दृष्टांच्या संहारासाठी साक्षात भगवंताने विविध अवतारही याच भूमीत घेतले. भगवंताच्या शिकवणुकीसार आचरण करून जीवनाचे सार्थक करून घेणारे अनेक संत महात्मे या भूमीने पाहिले. या संत महात्म्यांनी लिहिलेल्या ग्रंथ संपदेतील साध्या सोप्या सुगम अद्यात्मशास्त्रानुसार साधना करून अनेक जीव आज आनंदाची अनुभूती घेत आहेत. संप्रदाय, संघटना, संस्था नावाने आणि साधनापद्धतीने वेगवेगळे असले, तरी प्रत्येकाची शिकवण आणि ध्येय हे एकच म्हणजे शाश्वत आनंद अर्थात भगवतांची प्राप्ती हेच असते. त्यातही महाराष्ट्रभूमी ही तर अत्यंत पावन भूमी आहे. इथे अनेक अवतारांचे आणि संत महात्म्यांचे पदस्पर्श झाले आहेत, त्यामुळे येथील बहुसंख्य समाज हा देवाला मानणारा, त्याची उपासना करणारा धार्मिक प्रवृत्तीचा आहे.

         कलियुगातील मानव संसारात गुरफटलेला असेल, हे भगवंतानेही तेव्हाच जाणले होते म्हणून कलियुगासाठी साधी सोपी ‘नामसाधना' भगवंताने सांगितली आहे. ‘नामस्मरण' ज्याला स्थळ, काळ, वेळ, शौच, अशौच कशाचेही बंधन नाही. उठता-बसता, खाता-पिता, लिहिता-वाचता कोणत्याही वेळी तुम्ही नामजप करू शकता. नामजप ही मनाची साधना आहे. त्यामुळे त्यामध्ये शरीराचा अडथळा येत नाही. शरीराने तुम्ही कार्यालयात बसून काम करत आहात, मोल-मजुरी करत आहात, शेतात काम करत आहात, वाहन चालवत आहात किंवा घरी स्वयंपाक बनवत आहात, हे सर्व करत असतानाही मनाने  भगवंताचे नामस्मरण तुम्ही करू शकता. नामजपाच्या संस्काराने एकदा मनाची शुद्धी झाली की मनातील सारे विकार नष्ट होतात. मनातील विकार नष्ट झाले की मनाला ओढ लागते ती भगवंताची. आपल्या येथील समस्त संत मंडळींनी रचलेल्या अभंगांतून, ओव्यांतून आणि शिकवणुकीतून नामजपाची महतीच वर्णिली आहे. गावो-गावी येणारे प्रवचनकार आणि महाराज विविध ग्रंथांवर प्रवचने देत असले, तरी सर्वांची सामायिक शिकवण हीच आहे की ‘नाम घ्या' ! नामाचे महत्व आपणा सर्वांनाच ठाऊक असते. संतांच्या अभंगांतून आणि चरित्रांतून आपण ते वाचलेले असते, धार्मिक चित्रपटांतून आणि मालिकांतून पाहिलेले असते, परंतु नाम घेणे आणि त्यामध्ये सातत्य ठेवणे तितके सोपेही नाही. यासाठी भगवंत सत्संगाचे महत्व सांगतात, ज्याप्रमाणे मोबाईलला २ तास चार्जिंग केल्यावर पुढे १० ते १२ तास त्याची चार्जिंग टिकते, तेच कार्य सत्संगाच्या परिणामाने होत असते, संतांच्या आणि साधकांच्या सत्संगामुळे मनाला चार्जिंग म्हणजेच सात्विक सहवास मिळून ते चार्ज होते आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे  बराच काळ आपला नामजप चांगला होऊ लागतो. देवळे आणि मंदिरांचेही तेच महत्व आहे. नियमितपणे मंदिरांत गेल्याने साक्षात भगवंताचाच सहवास मिळतो आणि आपल्या साधनेला चालना मिळते.

            गावोगावी जाऊन प्रवचन करणारे महाराज विमानाने फिरतात, त्यांच्याकडे आलिशान मोटारगाड्या असतात, त्यांना लाखोंच्या देणग्या मिळतात, त्यांच्या सेवेला लवाजमा सोबत असतो अशी टीका समाजातील काही नास्तिक मंडळी करत असतात. ही मंडळी कधी राजकीय मंत्र्यांना आणि पुढाऱ्यांना जनतेच्या पैशातून मिळणाऱ्या सुविधा, त्यांचे आलिशान बंगले आणि करोडोची मालमत्ता यांवर कधी बोलताना दिसत नाहीत. अशा मंडळींनी थोडा अभ्यास करून या प्रवचनकारांचे अन्य कार्यही जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. ही प्रवचनकार मंडळी केवळ देणग्या घेत नाहीत तर ते कितीतरी पटीने दान-धर्मही करत असतात. अनेक आश्रम ही मंडळी चालवतात. यांच्या धर्मादाय संस्थांच्या वतीने विविध तीर्थक्षेत्री अन्नछत्रं चालवली जातात, विविध मंदिरांचे जीर्णोद्धार त्यांना मिळणाऱ्या देणग्यांतून केलेले आहेत, गोधन वाचवण्याचे आणि पालन पोषण करण्याचे पवित्र कार्यही ही प्रवचनकार मंडळी करत असतात. त्यांच्या या कार्यामुळेच भक्तगण सढळ हस्ताने त्यांना देणग्या देत असतात. त्यामुळे कुठे आपल्या पुढील बारा पिढ्यांच्या ऐशोआरामाची सोय करणारी राजकीय मंडळी आणि कुठे ही समाज आणि धर्मासाठी वाहून घेतलेली धार्मिक मंडळी. ज्यांना हे प्रवचनकार भोंदू किंवा समाजाला लुबाडणारे वाटतात त्यांनी त्यांच्या काय्रााविषयीही सविस्तर माहिती घ्यावी. आज यांच्यामुळे अनेक मंडळी देवधर्माला लागली आहेत. कित्येकांची व्यसने कायमची सुटली आहेत, कित्येकांचे  संसार मोडण्यापासून वाचले आहेत, अनेक जणांच्या वाईट सवयी सुटल्या आहेत. त्यामुळे समाजाप्रती असलेले यांचे ऋण दुर्लाक्षित करून कसे चालेल ? याआधीच्या काळात समाजाच्या देवभोळेपणाचा लाभ काही मंडळींनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलाही असेल; याचा अर्थ सर्वच प्रवचनकार हे समाजाला लुबाडण्याचे काम करतात असे म्हणून कसे चालेल ? ज्यांचा देवावरच विश्वास नाही अशा मंडळींनी धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करणेच योग्य आहे. - जगन घाणेकर, घाटकोपर. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

श्री.ना.पेंडसे यांचे मला आवडलेलं पुस्तक रथचक्र