दिघा येथे संयुवत जयंती महोत्सव सह १०१ ‘पँथर'चा सत्कार

दलितांवरील वाढते अत्याचार; पुन्हा ‘दलित पँथर'ची गरज - ना. रामदास आठवले

नवी मुंबई : देशात दलितांवरील वाढत्या अन्याय अत्याचाराविरोधात ‘दलित पँथर'ची पुन्हा एकदा स्थापना होण्याची गरज येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे लवकरच ‘दलित पँथर'ची स्थापना करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. ‘पँथर'ची पुन्हा स्थापना करण्यासंदर्भात अनेक विचारवंत, पत्रकार, साहित्यिक यांच्याशी चर्चा करण्यात आली असून लवकरच ‘दलित पँथर'ची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिघा येथे केली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-दिघा विभागाच्या वतीने महामानवांची संयुक्त जयंती महोत्सव आणि नवी मुंबईतील १०१ ‘पँथर'च्या सत्कार समारंभाचे आयोजन दिघा तलाव येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ‘दलित पँथर'च्या स्थापनेची घोषणा केली. याप्रसंगी पक्षाचे कायदेशीर सल्लागार ॲड. बि. के. बर्वे, ‘पर्यावरण विभाग'चे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराजे धमाल, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई निरीक्षक सिद्राम ओहोळ, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे, महिला अध्यक्षा शीलाताई बोदडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ज्या पँथर कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला, त्या कार्यकर्त्यांच्या बळावरच मला पँथर ते रिपब्लिकन पक्ष, सर्वसामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री या पदापर्यंत पोहोचवण्याचे काम खऱ्या अर्थाने पँथर आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले असल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले.

यावेळी रामदास आठवले यांचे स्वागत क्रेनच्या सहाय्याने मोठा हार घालून करण्यात आले. सदर कार्यक्रमात ‘लिटील चॅम्पस्‌ सारेगमप'ची विजेती ज्ञानेश्वरी घाडगे हिचा सत्कार ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोेजन ॲड. यशपाल ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिघा विभाग प्रमुख सागर सोनकांबळे यांनी केले होते. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण