४० लोकसभा, २०० विधानसभा जागा जिंकण्याचा ‘भाजपा'चा निर्धार

लोकसभा निवडणुकीसाठी आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडे मावळ मतदारसंघाची धुरा

पनवेल : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ‘भारतीय जनता पार्टी'ने ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा ८ जून रोजी केली आहे. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाची धुरा उत्तर रायगड जिल्हा भाजपाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. उरण विधानसभा मतदारसंघासाठी पनवेल तालुका भाजपाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेलसाठी रायगड जिल्हा भाजपा सरचिटणीस नितीन पाटील तर अलिबागसाठी दक्षिण रायगड भाजपा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप- शिवसेना युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ‘महाविजय अभियान २४'चे प्रदेश संयोजक आमदार श्रीकांत भारतीय, महाजनसंपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक आमदार प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

विधानसभा मतदारसंघात कर्जतसाठी किरण ठाकरे, पेणसाठी प्रसाद भोईर, श्रीवर्धनसाठी प्रशांत शिंदे आणि महाडसाठी बिपीन म्हामुणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

घणसोली मधील पाणी प्रश्नासाठी महिलांचा विभाग अधिकारी कार्यालयावर मोर्चा