खंडीत वीज पुरवठ्यामुळे होणाऱ्या नुकसानीची मुल्यांकन रवकम देयकातून वजा करा; अन्यथा आंदोलन

धोकादायक सब-स्टेशन तसेच डीपी नादुरुस्त असल्याने त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी - दशरथ भगत

 नवी मुंबई : वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आणि व्यावसायिकांच्या झालेल्या आर्थिक तसेच मानसिक नुकसानीचे मुल्यांकन करुन तशी रक्कम आगामी वीज देयकातून वजा करा. इतर प्राधिकरणांना कायद्याचे धाक दाखवणे थांबवा आणि सिव्हील कामांसह सेवेचा दर्जा राखा. अन्यथा जनआंदोलनास सामोरे जा, असा इशारा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते  दशरथ भगत यांनी ‘महावितरण'ला दिला आहे.

यासंदर्भात दशरथ भगत यांनी माजी नगरसेविका सौ. वैजयंती भगत यांच्या समवेत ‘महावितरण'चे वाशी विभागीय अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांची ६ जून रोजी भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. महापालिका प्रभाग क्र. ६५ (सेक्टर-३०, ३०अ, ३१ वाशी), प्रभाग क्र.७७ (सेक्टर-१,१३,१४,१५ पामबीच सानपाडा) आणि प्रभाग क्र.७८ (सेक्टर १६, १६अ, १७, १८, १९, २० पामबीच सानपाडा, सेक्टर-२२, २३ जुईनगर) या तिन्ही प्रभागांतील परिसरातील वीज पुरवठा अखंडीतपणे सुरु ठेवावा. तसेच अधिनियमानुसार आजमितीपर्यंत खंडीत झालेल्या वेळेत ग्राहकांच्या झालेल्या आर्थिक आणि मानसिक नुकसानीचे मुल्यांकन करुन येणारी रक्कम भरपाई म्हणून विद्युत बिलातून कमी करावी.
यासह ‘महावितरण'ने सदर क्षेत्रातील विद्युत यंत्रणा (केबल्स) नियमाप्रमाणे जमिनीखालील खोल ठेवण्याच्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खोदकामावेळी केबल्स तुटल्या जातात. या प्रकाराला सर्वस्वी ‘महावितरण' जबाबदार आहे. अनेक जागी इतर प्राधिकरणाद्वारे केबल्सना मार बसल्यास त्या प्रकाराला देखील ‘महावितरण'चे प्रशासन जबाबदार आहे. पण, सदरची जबाबदारी झटकून ‘महावितरण'तर्फे संबंधित प्राधिकरणाला भारतीय दंड संहिताचा धाक दाखवला जात आहे. त्यामुळे असे प्रकार ‘महावितरण'ने त्वरित थांबविण्याची मागणी दशरथ भगत यांनी सदर निवेदनातून केली आहे.

याशिवाय संबंधित क्षेत्रातील धोकादायक सब-स्टेशन तसेच डीपी नादुरुस्त असल्याने त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.  सेक्टर-३० वाशी, सानपाडा-पामबीच आणि सेक्टर-२२, २३  जुईनगर क्षेत्रातील विद्युत यंत्रणा कालबाह्य झालेल्या आहेत. त्या नव्याने बसविण्यात याव्यात. अन्यथा ‘महावितरण'च्या  निष्क्रिय आणि गचाळ कारभाराविरुध्द विद्युत ग्राहक असलेले नागरिक आणि व्यावसायिक यांच्या साथीने आंदोलन छेडण्यात येईल. त्याने होणाऱ्या परिणामाला ‘महावितरण'च जबाबदार असेल, असा इशाराही दशरथ भगत यांनी अधीक्षक अभियंता गायकवाड यांना सदर निवेदनाद्वारे दिला आहे.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

४० लोकसभा, २०० विधानसभा जागा जिंकण्याचा ‘भाजपा'चा निर्धार