‘आप'च्या ‘स्वराज्य यात्रा'चे नवी मुंबई मध्ये स्वागत

जनताभिमुख कामांमुळे सर्वसामान्य जनता ‘आप'कडे आकृष्ट - गोपाल इटालिया

नवी मुंबई : ‘आम आदमी पार्टी'चे संस्थापक-अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र समिती तर्फे राज्यात २८ मे पासून ‘स्वराज्य यात्रा'चे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वराज्य यात्रा'चे ४ जून रोजी नवी मुंबईत स्वागत करण्यात आले.

‘आप'च्या ‘स्वराज्य यात्रा'ला २८ मे रोजी विठू माऊलीचा आशीर्वाद घेत पंढरपूर येथून सुरुवात झाली आहे. राज्यभरातून सामील झालेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नुक्कड सभा, पथनाट्ये, लोकगीते अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांसह  पंढरपूर, सोलापूर, श्रीगोंदा, बारामती, सांगली, पलूस, कोल्हापूर, सातारा,पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, पनवेल येथून फिरत जवळपास ७८२ किलोमीटरची दरमजल करीत उद्या ६ जून रोजी शिवराज्यभिषेकाच्या शुभमुहूर्तावर ‘किल्ले रायगड'च्या पायथ्याशी पाचाड येथे पोहोचणार आहे. याठिकाणी ‘स्वराज्य यात्रा'ची सांगता होणार आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेकडून ठिकठिकाणी ‘स्वराज्य यात्रा'चे स्वागत होत आहे.

‘स्वराज्य यात्रा' ४ जून रोजी नवी मुंबईत दाखल झाली. बेलापूर येथून ‘स्वराज्य यात्रा'ला सुरुवात झाल्यानंतर वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, ऐरोली मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दिघा तलाव मार्गे ती ‘ठाणे'च्या दिशेने रवाना झाली. ‘स्वराज्य यात्रा'दरम्यान आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीबाबतही गोपाल इटालिया यांनी ‘आप'च्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

विद्यमान राज्यकर्त्यांकडून देशात हुकूमशाही सुरु असून त्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. त्यामुळे शून्य भ्रष्टाचारावर आधारित जनताभिमुख कामे करुन दाखविणाऱ्या आणि अल्पावधीत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविणाऱ्या ‘आम आदमी पार्टी'कडे सर्वसामान्य जनता झपाट्याने आकृष्ट होत आहे. - गोपाल इटालिया - महाराष्ट्र प्रभारी - आम आदमी पार्टी.

‘स्वराज्य यात्रा'मध्ये सामील झालेल्या महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया यांच्यासह राज्य समितीचे सर्व सदस्य, नवी मुंबई कार्यकारिणी, ‘आप'चे कार्यकर्ते तसेच नवी मुंबईकर नागरिकांचे मनपूर्वक आभार. टीम आप नवी मुंबई लवकरच येऊ घातलेली महापालिका निवडणूक लढविण्यास १११ प्रभागातील उमेदवारांसह सज्ज आहे. नवी मुंबईतील सुशिक्षित आणि सुज्ञ जनता आप सारख्या इमानदार पार्टीची नक्की साथ देईल, असा विश्वास आहे. - श्यामभाऊ कदम, कार्यकारी अध्यक्ष - आप नवी मुंबई.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

खंडीत वीज पुरवठ्यामुळे होणाऱ्या नुकसानीची मुल्यांकन रवकम देयकातून वजा करा; अन्यथा आंदोलन