दिघा रेल्वे स्थानक सुरु करण्याची मागणी

दिघा रेल्वे स्थानकाला उद्‌घाटनाची प्रतिक्षा

नवी मुंबई ः ठाणे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत ऐरोली-कळवा एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्पातील तयार झालेले दिघा रेल्वे स्थानक सुरु करा, अशी मागणी ‘ठाणे'चे खासदार राजन विचारे यांनी केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव  तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्पाच्या कामाचे भूमीपुजन १० डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर वर्षभर या प्रकल्पाचे काम सुरु होत नव्हते. परंतु, सदरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रद्द होऊ नये यासाठी आपण तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तसेच रेल्वे प्रशासन, मुंबई रेल विकास प्राधिकरण (एमआरव्हीसी) यांच्याकडे पाठपुरावा करुन सदर प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये करुन घेत यातील अडथळे दूर केले. यानंतर दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण करुन घेतले. आजतागायत गेले ४ महिने उलटूनही दिघा रेल्वे स्थानकाचा लोकार्पण सोहळा होत नसल्याने दिघावासियांना त्याची खूप महिन्यांपासून प्रतिक्षा आहे. याबाबत दिघावासियांची नाराजी आपण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मांडली आहे, असे खा. राजन विचारे यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.

दिघा गांव आणि परिसरात नागरी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असून याच परिसरात आयटी कंपन्या देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या विभागात येणाऱ्या सर्व कामगार वर्गाला ऐरोली स्थानक येथे उतरुन दिघा येथे यावे लागते. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी लवकर दिघा रेल्वे स्थानक सुरु करा, अशी मागणी खा. राजन विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच या प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील कळवा-एलिव्हेटेड रेल्वे स्थानक आणि मार्गिका याचे काम सुरु करण्यासाठी १०८० झोपड्यांच्या पुनर्वसनाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे सदर कामाला देखील गती देऊन याचेही काम लवकर सुरु करावे, अशी मागणी खा. राजन विचारे यांनी सदर पत्रातून केली आहे.

दरम्यान, या संदर्भात खासदार राजन विचारे यांनी ‘मध्य रेल्वे'चे महाव्यवस्थापक, रेल्वे प्रबंधक आणि ‘एमआरव्हीसी'चे चेअरमन यांच्याकडे देखील मागणी केली आहे.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘आप'च्या ‘स्वराज्य यात्रा'चे नवी मुंबई मध्ये स्वागत