मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘राष्ट्रवादी'ला आणखी एक धक्का

आ. शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषीकांत शिंदे यांचा ‘शिवसेना'मध्ये प्रवेश

वाशी ः ‘राष्ट्रवादी'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांना गळाला लावल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘राष्ट्रवादी'चे आमदार तथा माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांना झटका दिला आहे. आ. शशिकांत शिंदे यांचे लहान बंधू ऋषीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शिवसेना'मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

नवी मुंबई शहरात पुनर्विकासाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. परिणामी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका देखील गाजावाजा करत राजकीय निवडणुकांच्या ताकदीने लढविण्यात आल्या. घणसोली येथील गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी पूर्ण ताकद लावून निवडणूक जिंकली. पाच महिन्यांपूर्वी घणसोली मधील सिम्पलेक्स गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकीत ऋषीकांत शिंदे यांच्या गटाने बाजी मारली होती. या सोसायटीत तीन हजार माथाडी कामगारांना ३३ इमारतीत ३३०० घरे देण्यात आली होती. याच इमारतींच्या पुर्नविकासाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सर्व पुर्नविकासाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, या पुर्नविकासाची फाईल नगरविकास विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पोहचली आहे. या कामात कुठलीही आडकाठी नको म्हणून ऋषीकांत शिंदे यांनी शिवसेना मध्ये प्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे.
गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये पुर्नबांधणीचे वाढते प्रकल्प आणि बांधकामावर वर्चस्व मिळविण्यासाठी आता राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. याचाच भाग म्हणून घणसोली येथील माथाडी वसाहतीत वर्चस्व असणाऱ्या ऋषीकांत शिंदे यांचा शिवसेना प्रवेश महत्वाचा ठरणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील पुर्नविकासाच्या कामाला कुठेही आडकाठी येऊ नये म्हणुन शिंदे गटात प्रवेश केला जात आहे. नेरुळ मधील श्री गणेश सोसायटीचा पुनर्विकास मार्गी लागावा म्हणून  अशोक गावडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. आता ऋषीकांत शिंदे यांनी शिवसेना मध्ये प्रवेश केला आहे.

 माथाडी कामगार संघटनेत संयुक्त सरचिटणीस म्हणून ऋषीकांत शिंदे कार्यरत आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या प्रवेशाने एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुकांसाठी पक्ष मजबूत आणि एपीएमसी बाजार समितीवर आपली पकड अशी एका बाणात दोन कामे उरकण्याचा  प्रयत्न केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऋषीकांत शिंदे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे आता घणसोलीतील माथाडी गृहनिर्माण प्रकल्पाच्या पुर्नविकासाला गती मिळणार असून येणाऱ्या अडचणीतून मार्ग मोकळा झाला आहे. एपीएमसी बाजार समिती देखील पुनर्विकासाच्या वाटेवर आहे. एपीएमसी बाजार समिती संचालक मंडळावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं वर्चस्व असून, शिंदे यांच्या मदतीने एपीएमसी बाजार समिती ताब्यात ठेवली जाते. आता शिंदे बंधूंची ताकद विभागल्याने एपीएमसी बाजार समितीवर शिवसेना आपली पकड घट्ट करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईमध्ये पर्यावरणदिनी भव्य वृक्षारोपण मोहीम