घणसोली मनसे कडून पालिकेला तक्रार पत्र

घणसोली मधील व्यावसायिकांनी समासी जागेवर अतिक्रमण केल्याने मनसे आक्रमक

घणसोली : घणसोली नोडल भाग मागील सात वर्षापासून विकसित होत आहे. नवनवीन इमारती उदयाला आल्या आहेत.त्यामध्ये व्यवसायिक गाळ्यांची निर्मिती केली आहे.त्या समोर ग्राहकांना साहित्य खरेदी करण्यासाठी समासी जागा राखीव ठेवण्यात आली आहे.परंतु काही व्यावसायिकांनी स्वार्थापोटी ह्या जागा अडवल्या आहेत.यावर कारवाई व्हावी.म्हणून मनसेचे शाखा अध्यक्ष नितीन काटेकर यांनी समसी जागेवर अतिक्रमण करणाऱ्या विरोधात कारवाईची माहिती माहिती कायद्याअंतर्गत मागवली होती.त्या मिळालेल्या माहिती नुसार पालिकेने विशिष्ट व्यावसायिकावर कारवाई केली असल्याचे समोर आले आहे.म्हणून घणसोली विभाग कार्यालयाला मनसचे शाखा अध्यक्ष नितीन काटेकर यांनी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.

घणसोली मनपा कार्यालयाकडे सन २०२० ते सन २०२३ दरम्यान अतिक्रमण विभागामार्फत कोणकोणत्या ठिकाणी कारवाई करण्यात आली याबाबत माहिती मागवली होती. त्यानुसार कार्यालयामार्फत  १६ मे २०२३ रोजी माहिती देण्यात आली. त्या संपूर्ण माहितीचे अवलोकन केले असता  अतिक्रमण विभाग घणसोली मनपा यांचे मार्फत फक्त मोजक्या वैयक्तिक बांधकामांच्या विरोधात सुचनापत्र बजाविण्यात आलेले आहेत आणि काही मोजक्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. मुळात घणसोली सेक्टर ५ मध्ये अनेक ठिकाणी हॉटेल्स, कपड्यांचे दुकाने, मिठाई चे दुकाने हे पदपथावर अतिक्रमण करून सर्व नियमांचे उल्लंघन करून वाढविण्यात आलेले आहे. यामध्ये पारस कलेक्शन नावाचे सेक्टर ५ मधील दोन्ही दुकाने, रामकृष्ण हॉटेल, शिव रोशनी हॉटेल, गुरुश्याम हॉटेल, न्यू प्रेम स्वीट, किड्स चॉईस असे काही दुकाने आहेत.त्यांच्यावर कारवाई का केली नाही असा सवाल तक्रार पत्र विचारला आहे.

पादचाऱ्यांना  पायी चालण्यासाठी जे पदपथ बनविण्यात आलेले आहेत त्यावर कोणत्याही स्वरूपाचा व्यवसाय करणे, किंवा आपले वैयक्तिक सामान तेथे दीर्घकाळासाठी ठेवणे, किंवा त्यावर वाहने उभी करणे या सर्व बाबी नियमबाह्य आहेत. हे सर्वांना समजते, म्हणून त्या पदपथावर दिवसाला शे दोनशे रुपये कमविणाऱ्या भाजीपाला विक्रेता, पाणीपुरी किंवा खाद्यपदार्थ विक्रेत्याने अल्पकाळासाठी आपले दुकान लावले तर, आपल्या अतिक्रमण विभागाच्या  अधिकाऱ्यांना लगेचच जाग येते आणि ते प्रशासनाची गाडी घेऊन येतात व तेथील किरकोळ विक्रेत्याचे संपूर्ण दुकान उचलून आणतात. मग त्याच्या बाजूला असलेले ही दुकाने, हॉटेल्स ज्यांनी दीर्घकाळासाठी नवीन टाईल्स बसविल्या आहेत, तेथे त्यांचे दुकानातील देव, खुर्ची, कपडे परिधान केलेले पुतळे आदी वस्तू पुर्ण दिवसभर ठेवलेल्या असतात नेमकं त्याच वस्तू आपल्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना का दिसत नाही?असाही थेट सवाल तक्रार पत्रात विचारला आहे.

 लोकांना चालण्यासाठी बनविण्यात आलेल्या पदपथावर आपल्या दुकानाला साजेशा टाईल्स बसविणे कोणत्या नियमानुसार योग्य आहे .याबाबत आपणच आम्हास मार्गदर्शन करावे, आता लवकरच पावसाळा सुरु होणार आहे मग, लोकं पदपथावरून चालताना त्यांचे मातीचे भरलेले चप्पल किंवा बुट या दुकानदारांनी बसविलेल्या टाईल्स वर आले तर, हे दुकानदार लोकांना उर्मटपणे बोलतात, त्यांना रस्त्यावरून चालण्याचा सल्ला देतात. स्वतः नियमांचे उल्लंघन करून सामान्य जनतेला नियम शिकवितात.यावर कारवाई होणे अत्यंत अत्यावश्यक आहे. - नितीन काटेकर,शाखा अध्यक्ष, मनसे,घणसोली.

मनसे कडून प्राप्त पत्राचे अवलोकन करून पुढील कार्यवाही साठी अतिक्रमण विभागाला पाठवले आहे.त्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. - संजय तायडे,सहाय्यक आयुक्त घणसोली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘राष्ट्रवादी'ला आणखी एक धक्का