आ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून ४५  कोटींची विकास कामे प्रगतीपथावर

दिवाळे गांवची ‘स्मार्ट व्हिलेज'च्या दिशेने वाटचाल

नवी मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण देशातील गावांचे ‘स्मार्ट व्हिलेज'चे स्वप्न तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाव दत्तक योजना अंतर्गत ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिवाळे गांव दत्तक घेतले आहे. नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून ‘दिवाळे गांव-स्मार्ट व्हिलेज'च्या अंतर्गत दिवाळे गावातील स्थानिक डोलकर मच्छीमार संस्थाकरिता जाळी विणण्याकरिता निवारा शेड आणि स्टोअर रुम तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता २ गजेबो या सुविधांचा लोकार्पण सोहळा आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका शहर अभियंता संजय देसाई आणि माजी विरोधी पक्षनेता पंढरीनाथ पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

तसेच सदर ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ग्रंथालय-संगणक प्रशिक्षण केंद्र, बहुद्देशीय इमारत, तरुणांसाठी व्यायामशाळा  वास्तुचे भूमीपुजन ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, साबू डॅनियल, अशोक गुरखे, दीपक पवार, माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, ‘भाजपा'चे बेलापूर विधानसभा संयोजक तथा जिल्हा महामंत्री निलेश म्हात्रे, डॉ. राजेश पाटील, दत्ता घंगाळे, जगन्नाथ जगताप, राजू तिकोने, दर्शन भारद्वाज, दामोदर पिल्ले, संजय ओबेरॉय, रवी ठाकूर, संदेश पाटील, पांडुरंग कोळी, रमेश हिंडे, अनंता बोस, चंद्रकांत कोळी, परशुराम पाटील, सुरेखा कोळी तसेच भाजपा पदधिकारी, स्थानिक कोळी बांधव आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते.


 स्मार्ट व्हिलेज अंतर्गत भव्य, सुसज्ज सर्व सुविधांयुक्त मच्छी मार्केट, उद्यान, मासे सुकविण्यासाठी प्लॅटफॉर्म, स्टेज, समाज मंदिर, रिंगरोड, स्वाध्याय हॉल, प्रसाधनगृहे, लहान मुलांकरिता खेळणी, विरंगुळा केंद्र , गजेबो गार्डन, बहुउद्देशीय इमारत, ओपन जिम, चारचाकी वाहनतळ, भाजी-फळ मार्केट आदिंचे सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याकरिता १५ कोटी रुपये अपेक्षित खर्च करण्यात येणार आहे. याकरिता आमदार निधीची तरतूदही करण्यात येणार आहे. दिवाळे गांव स्मार्ट व्हिलेज म्हणून तयार होणार असल्याने स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. याठिकाणी चांगले शिक्षण, आरोग्य सुदृढ होण्यास मदत मिळणार आहे. स्वच्छता आणि सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.


तसेच त्यांनी पुढे सांगितले की, आदरणीयपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा, ग्रामीण भागातील नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज तयार करावे, असे स्वप्न बघितले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गाव दत्तक योजनेच्या माध्यमातून सन २००४ सालापासून दिवाळे गांव मी दत्तक घेतले असून या गावामध्ये अनेक जेट्टी उभारल्या आहेत. दिवाळे गांवाच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कोटींची तरतूद करण्यात आलेली असून आता दिवाळे गांव स्मार्ट व्हिलेज म्हणून तयार होणार आहे. यातून स्थानिकांना रोजगार, चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा मिळणार आहेत. स्वच्छता आणि सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार आहे. तसेच उर्वरित विकास कामे दिवाळी पर्यंत पूर्ण होणार असून त्याचाही लोकार्पण सोहळा होणार आहे. दिवाळे गांव स्मार्ट व्हिलेज करिता विकास कामांसाठी जवळपास ४५ कोटींची विकास कामे प्रगतीपथावर सुरु असल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.

दिवाळे गांव संपूर्ण कोळी लोकांचे गाव असून गेले वर्षानुवर्षे येथील त्यांचा मच्छीमार पारंपारिक व्यवसाय असून संपूर्ण पंचक्रोशीत नागरिक या ठिकाणी मासळी खरेदी करण्याकरिता येत असतात. येथील तरुणांना आणि महिलांना आपले आरोग्य सुदृढ व्हावे याकरिता ग्रंथालय, संगणक प्रशिक्षण केंद्र, लग्न कार्यक्रमाकरिता नागरिकांसाठी बहुद्देशीय इमारत, तरुणांसाठी व्यायामशाळा बांधण्यात येत आहे. दिवाळे गांव विकासाचा माझा पायलट प्रोजेक्ट असून त्याच धर्तीवर बेलापूर मतदारसंघातील इतर गावेही स्मार्ट व्हिलेज म्हणून उदयास येणार आहेत. -आमदार सौ.मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

४ जून रोजी ‘स्वराज्य रॅली'चे नवी मुंबईत स्वागत