भाजपा मध्ये आणखी खांदेपालट

नवी मुंबई जिल्हा भाजप अध्यक्ष पदाची माळ संदीप नाईक यांच्या गळ्यात ?

वाशी ः आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच नवीन भाजप प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. तर आता भाजपामध्ये आणखी खांदेपालट होणार असून, नवी मुंबई जिल्हा भाजप अध्यक्ष पदाची माळ माजी आमदार संदीप नाईक यांच्या गळ्यात पडणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापलिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांची टीम तयार करण्याचा भाजप प्रदेशाध्यक्षांचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष निवडणुकीपूर्वी एकत्र आले तर त्यांना टक्कर देण्यासाठी आतापासूनच पक्षातील चांगले काम करणाऱ्यांना हेरुन त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्याचा ‘भाजप'चा प्लान आहे. त्यानुसार नवी मुंबई जिल्हा भाजप अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या पदावर रामचंद्र घरत मागील सात ते आठ वर्षांपासून आहेत. नवी मुंबई जिल्हा भाजप अध्यक्ष पदासाठी माजी आमदार संदीप नाईक, डॉ. राजेश पाटील आणि सतीश निकम यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, तरुण तसेच अनुभवी नेत्याच्या खांद्यावर नवीन भाजप जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात काही वरिष्ठ भाजप पदाधिकारी आग्रही असल्याने माजी आमदार संदीप नाईक यांच्या नावावर जवळपास शिक्कमोर्तब झाले असून, येत्या एक दोन दिवसात संदीप नाईक यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नेरुळ आणि जुईनगर नोडमधील नागरी समस्यांचे निवारण करण्याची नवी मुंबई जिल्हा काँग्रेसची मागणी