छ. शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुंबई ते दुर्गराज रायगड रथयात्रा

शिवराज्याभिषेक सहस्त्र जलाभिषेक कलश रथयात्रेचे नवी मुंबईत जल्लोषात स्वागत 

नवी मुंबई -:हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुंबई ते दुर्गराज रायगड येथे  सहस्त्र जलकलश घेऊन जाणाऱ्या रथयात्रेचे आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवी मुंबई नगरीमध्ये आज जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

मराठी तिथीप्रमाणे येत्या २ जून २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड येथे साजरा होणार आहे. यानिमित्त गंगा,यमुना, सरस्वती, कावेरी अशा देशातील प्रमुख नद्यांच्या पवित्र जलाने शिवराज्याभिषेक करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी  महाराजांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पवित्र नद्यांच्या जल कलशाची रथयात्रा काढण्यात आली आहे. काल शुक्रवार २६ मे रोजी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी या रथयात्रेचा राजभवन येथे शुभारंभ केला. शनिवारी दुपारी ही रथयात्रा वाशी येथे पोहोचली. यावेळी आमदार गणेश नाईक यांनी या रथयात्रेचे स्वागत केले. त्यांच्यासह अन्य मान्यवर आणि उपस्थितांनी कलश पूजन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला  आमदार नाईक यांनी पुष्पहार अर्पण केला. महाराजांचा जयजयकार यावेळी ढोल ताशांच्या गजरामध्ये करण्यात आला. माजी खासदार संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण पडते, छत्रपती शिवाजी महाराज शिवशंभो विचार मंच कोकण प्रांत सहसंयोजक अभय जगताप, सचिव सुधीर थोरात, शिवराज्याभिषेक दिन उत्सव सेवा समिती सहकार्यवाह पंकज भोसले, उपाध्यक्ष संजय ढमाळ, खजिनदार राजू देसाई, स्थानिक नगरसेविका अंजली वाळुंज, समाजसेवक विजय वाळुंज, अजय वाळुंज, लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे सदस्य आणि शिवभक्त शिवप्रेमी रणरणत्या उन्हामध्ये देखील छत्रपती महाराज यांच्या विषयीचे प्रखर, ओजस्वी विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सुजान राजा होणे नाही असे सांगून महाराजांनी स्वराज्यामध्ये जात-पात ,वर्ण ,पंथ ,धर्म, यांच्या पलीकडे जाऊन सर्वांना समानतेची आणि सन्मानाची वागणूक दिल्याचे नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक गोष्ट अनुकरणीय होती. त्यांचा लढाईतला गनिमी कावा हा विषय इंग्रजांसाठी अभ्यासाचा विषय होता. महाराजांनी उभे केलेले आरमार त्यांच्या दूरदर्शी संरक्षण विषयक नेतृत्वाच प्रतीक होतं. महाराज स्वतःला राजे म्हणून घेण्यापेक्षा रयतेचे विश्वस्त असल्याचे मानत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांचे शौर्य त्यांचा विचार भारतीयांना ऊर्जा आणि प्रेरणा देत राहणार आहे. महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा हा चिरकाल स्मरणात राहील असा साजरा होईल, असा विश्वास आमदार गणेश नाईक यांनी यावेळी  व्यक्त केला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भाजपा मध्ये आणखी खांदेपालट