विजय चौगुले यांचा सवाल; तपासासाठी लवकरच पोलीस उपायुवतांची घेणार भेट

‘त्या' महिलेचा बोलावता धनी कोण?

नवी मुंबई ः दिड वर्षापूर्वी आमदार गणेश नाईक यांच्या लैंगिक शोषणाचा जाहीरपणे आरोप करतानाच आपल्या १५ वर्षीय मुलाच्या भवितव्याचा विचार करुन नाईक यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर प्रसिध्दी झोतात आलेल्या दिपा चौहान या महिलेने नुकतेच या प्रकरणातून घुमजाव केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आमदार नाईक यांच्या विरोधात केलेले आरोप आपण आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना'चे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या सांगण्यावरुन केल्याचे पत्र नेरुळ पोलिसांना दिल्याने आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दिपा चौहान यांच्या या लेटरबॉम्ब नंतर आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सर्वप्रथम या महिलेच्या जीविताला धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्याची मागणी करताना उलट या लेटरबॉम्ब प्रकरणाचा तपास करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुवत मिलिंद भारंबे आणि गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.

त्यापाठोपाठ आता जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी देखील दिपा चौहान यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे १९ मे रोजी पत्रकार परिषद मध्ये खंडन करीत सदर महिलेला धाकात ठेवून असे आरोप करायला लावणारा तिचा बोलावता धनी कोण? याचा तपास होण्यासाठी परिमंडळ-१ चे पोलीस उपायुवत विवेक पानसरे यांना लवकरच पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वास्तविक पाहता दिपा चौहान या महिलेने आमदारांविरोधात केलेल्या आरोप प्रकरणी सध्या न्यायालयीन चौकशी सुरु आहे. त्यामुळे सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना अचानक या महिलेने आरोप मागे घेत असल्याबद्दलचे पत्र पोलिसांना दिले आहे. त्यामुळे सर्वप्रथम दिपा चौहान यांना पोलिसांनी संरक्षण देण्याची आणि या महिलेची नार्को टेस्ट करण्यासाठी पोलिसांकडे मागणी करणार आहे. याशिवाय या प्रकरणात आमचे नाव कोणाच्या सांगण्यावरुन टाकण्यात आले, याचा शोध घ्ण्यासाठी आम्ही या प्रकरणी न्यायालयात देखील जाणार असल्याचे विजय चौगुले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, निवडणुका जवळ आल्या की विजय चौगुलेला टार्गेट करायचे, असे ठराविक लोकांचे कायमचे मनसुबे राहिले आहेत.  कोणत्या तरी प्रकरणात विजय चौगुले यांचे नाव आले म्हणजे निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असे समजायचे. आज मी राज्यात शिंदे-भाजपा युती सरकार मध्ये आहोत. जिल्हाप्रमुख म्हणून मी कार्यरत असल्याने माझी काही नैतिकता असे सांगत विजय चौगुले यांनी यावेळी लेटरबॉम्ब नंतर आलेल्या नैराश्येसंदर्भात आणि कुटुंबियांकडून होत असलेल्या दबावाबाबत सदर महिलेेने त्यांच्यासोबत केलेले संभाषण ऐकवून दाखवले.

सदर पत्रकार परिषद प्रसंगी ‘बाळासाहेबांची शिवसेना'चे संपर्कप्रमुख किशोर पाटकर, माजी नगरसेवक रामाशिष यादव, जगदीश गवते, ममित चौगुले, आकाश मढवी, रामचंद्र पाटील, अजित सावंत, आदि उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘अमित ठाकरे रक्तदाता अभियान'चे पोस्टर अनावरण