दुषित पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्याची विद्या भांडेकर यांची आयुक्तांकडे मागणी

नेरुळ मध्ये दुषित पाण्यामुळे रहिवाशी हैराण

नवी मुंबई : महापालिका कडून होत असलेल्या दुषित पाणी पुरवठ्याच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची  मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या चार-पाच दिवसांमध्ये सदर समस्येचे निवारण न झाल्यास तेच पिवळसर दुषित पाणी विभाग अधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांना पिण्यासाठी देणार असल्याचा इशारा विद्या भांडेकर यांनी सदर निवेदनातून दिला आहे.

नवी मुंबई महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने नेरुळ, सेक्टर-२, ४ तसेच जुईनगर नोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिवळसर स्वरुपातील दुषित पाण्याचा पुरवठा होवू लागला आहे. पाणी गाळून, उकळून जरी प्यावे लागत असले तरी उकळल्यानंतरही पाण्याचा पिवळसरपणा राहत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या पिवळसर स्वरुपातील दुषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा पर्यायाने जीविताला धोका निर्माण होण्याची भिती आहे. दुषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक उघडपणे महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त करु लागले आहेत, असे विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांना दिेलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

त्यामुळे लवकरात लवकर महापालिका प्रशासनाने सदर समस्येवर तोडगा काढण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत. या समस्येचे गांभीर्य पाहता जर चार-पाच दिवसात त्यावर तोडगा न निघाल्यास परिसरातील महिला तेच पिवळसर पाणी नेरुळ विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांना पिण्यास भाग पाडतील, असा इशारा देखील विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

विजय चौगुले यांचा सवाल; तपासासाठी लवकरच पोलीस उपायुवतांची घेणार भेट