बिअर शॉपीमुळे होणाऱ्या त्रासातून स्थानिक नागरिकांची सुटका करण्याची मागणी

 बिअर शॉपीमुळे होणाऱ्या त्रासातून स्थानिक नागरिकांची सुटका करण्याची ‘काँग्रेस'च्या विद्या भांडेकर यांची मागणी

नवी मुंबई : नेरुळ, सेक्टर-२ एलआयजी वसहतीशेजारील समाधान बिअर शॉपीमुळे होणाऱ्या त्रासातून स्थानिक नागरिकांना मुक्त करा, अशी मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या सचिव विद्या भांडेकर यांनी नेरुळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे केली.

नेरुळ, सेक्टर-२ एलआयजी वसाहती शेजारी मिनी मार्केटमध्ये समाधान बियर शॉपी चालू आहे. या शॉपीमध्ये येणारे तरुण मुले बियर घेऊन त्याच ठिकाणी पित बसतात. तसेच आजुबाजुच्या लोकांच्या दरवाजाजवळ लघुशंका करतात. भांडणे, राडा, गलिच्छ भाषेतील शिवीगाळ असा प्रकार याठिकाणी नित्याचाच झाला आहे, असे विद्या भांडेकर यांनी नेरुळ पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. त्याच ठिकाणी बाजूला चक्की आहे, चक्कीला लागूनच घर आहेत. चक्कीमध्ये दळणटाकण्यासाठी अथवा घेऊन जाण्यासाठी महिला तसेच मुलींची ये-जा असते.परंतु, बिअर शॉपी मुळे होणाऱ्या मारामाऱ्या, शिवीगाळ यामुळे घरातून बाहेर महिला, मुली पडत नाही. सायंकाळ झाल्यावर येथील रस्त्यावर टोळके बियर पीत उभे असते. महिला आणि मुलींना तेथून ये-जा करणे अवघड झाले आहे. या दुषित वातावरणामुळे सभोवतालच्या लहान मुलांवर विपरीत परिणाम होत असून त्यांच्या
संभाषणात सर्रासपणे शिव्या येऊ लागल्या असल्याची बाब विद्या भांडेकर यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

बिअर शॉपीत या, माल घेवून जा; पण तिथेच पिणे योग्य नाही. संबंधित प्रकाराला आळा लवकरात लवकत घातला न गेल्यास याठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भिती आहे. त्यामुळे सदर समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी नेरुळ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी विद्या भांडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री, ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री, नवी मुंबई पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांना प्रशासकीय पातळीवर सदर समस्या निवारणासाठी निवेदनातून साकडे घातले आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

दुषित पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्याची विद्या भांडेकर यांची आयुक्तांकडे मागणी