माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

‘नैना' प्लॉट हस्तांतरणाला विरोध

नवीन पनवेल ः पनवेल तालुक्यातील २३ गावांमध्ये नैना प्रकल्प येऊ घातलेला आहे. देवद येथील जय हनुमान क्रिकेट मैदान येथे ‘नैना'तर्फे प्लॉट हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी माजी आमदार बाळाराम पाटील, जी. आर. पाटील, राजेश केणी, सुभाष भोपी, नामदेव फडके, अनिल ढवळे, नरेंद्र भोपी, शेखर शेळके यांच्या नेतृत्वाखाली सदर ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करुन प्लॉट हस्तांतरण कार्यक्रमाला जाहीर विरोध केला. मात्र, शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता ‘नैना'तर्फे प्लॉट हस्तांतरणाचा कार्यक्रम सुरु ठेवण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा बोलावण्यात आला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शवत सदर कार्यक्रम बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

देवद येथील सर्वे नंबर ७८/० या जागेचा ‘नैना'तर्फे प्लॉट हस्तांतरण करण्यात येत होते. या हस्तांतरणाला येथील शेतकरी बांधवांनी प्रखर विरोध केला. वेळ पडली तर रक्त सांडवू; मात्र जमीन फुकटात देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी देखील शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट करुन या प्लॉट हस्तांतरण कार्यक्रमाला विरोध दर्शवला. स्थानिकांचा विचार न करता इतरांचा विचार केला तर वेगळ्या पध्दतीने आम्हाला विचार करावा लागेल आणि स्थानिकांचा विचार करूनच पुढचे निर्णय घ्या; अन्यथा पुढचे आंदोलन उग्र असेल, असा इशारा बाळाराम पाटील यांनी यावेळी दिला.

नैना प्रकल्प होऊ देणार नाही. आपण अटक करुन घेऊया अशी रोखठोख भूमिका जी. आर. पाटील यांनी मांडली. यावेळी शेतकऱ्यांनी सर्व्हे बंद करण्याचा प्रयत्न केला. तसेच पुढच्या काळात प्रकल्पग्रस्तांची ताकद वाढवून आंदोलन करावे लागणार असल्याचा निर्धार केला. तर शेतकऱ्यांना जर जमीन द्यायची नसेल तर हिटलर शाहीने जमीन ताब्यात घेणार का? असा सवाल संतप्त सवाल नरेंद्र भोपी यांनी सिडको अधिकाऱ्यांना विचारला. नैना उद्योगपतींना विकले गेले आहे का? कायद्याचे रक्षकच भक्षक झाले आहेत का? असा सवाल पाटणकर यांनी केला. आमची जमीन फुकट न घेता जमीन अधिग्रहण करा, असे यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले. सुकापूर येथे ३० माळ्याच्या इमारतीचे काम सुरु असून या प्रकल्पात विमान अडकणार नाही. मात्र, शेतकऱ्यांनी बांधलेल्या चार माळ्याच्या इमारतीला कोणते विमान धडकणार आहे? असा मुद्दा राजेश केणी यांनी उपस्थित करत ‘नैना'सोबत नियोजन बैठक लावण्याची मागणी करण्यात आली. दुसरीकडे ७८/० सर्व्हे नंबर असलेला प्लॉट २३ कोटी रुपयांना विकला गेला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, ‘सिडको'च्या माध्यमातून बैठक लावण्यात येणार असल्याचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मनसे नेते अमित ठाकरे यांचे शिक्षणमंत्री केसरकर यांना निवेदन