महिलांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सहाय्यता कक्ष

 नवी मुंबई पोलिसांतर्फे महिला सहाय्यता केंद्र, स्वतंत्र सायबर पोलीस ठाणेची निर्मिती

नवी मुंबई ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर पिडीत महिलांच्या मदतीसाठी महिला सहाय्य कक्ष सुरु करण्यात आले असून या महिला सहाय्य कक्षाचे उद्‌घाटन तसेच नेरुळ, सेक्टर-७ मधील सावली सेंटर मधील महिला सुरक्षा प्रकल्प आणि त्याच ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ११ मे रोजी होणार आहे. महिलांच्या मदतीसाठी सुरु करण्यात येणाऱ्या निर्भया पथक वाहनांचे देखील ना. देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते ध्वजांकित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे पोलीस महासंचालक रजनिश शेठ उपस्थित राहणार आहेत.  

नवी मुंबई शहरात देखील महिलांची छेड काढणे, लैंगिक छळ अथवा विनयभंग यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय वैवाहिक संबध-कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, हुंडाबळी, पती-नातेवाईक यांच्याकडून होणाऱ्या छळांची प्रकरणे वाढली आहेत. अशा प्रकरणात महिलांच्या समस्या समजून घेणे, त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करुन त्यांना योग्य न्याय देण्याच्या उद्देशाने प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सहाय्य कक्ष सुरु करण्यात आले आहेत. महिला  आणि मुलींच्या संबंधातील सर्व प्रकारच्या तक्रारी सदर महिला सहाय्य कक्षातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांकडून हाताळले जाणार असल्याने महिलांना आता निःसंकोच तक्रार करता येणार आहे. महिलांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी २४ तास महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.  

महिलांसाठी निर्भया पथक...  
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने महिलांच्या आपत्कालीन मदतीसाठी निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात २४ तास निर्भया पथक कार्यान्वित राहणार आहे. संकटात असलेल्या एखाद्या महिलेने या ‘निर्भया पथक'ला संपर्क साधल्यास महिलांचे निर्भया पथक तत्काळ घटनास्थळी दाखल होणार आहे. महिला निर्भया पथक चार चाकी वाहनातून अथवा स्कुटीवरुन तत्काळ घटनास्थळी पोहोचून पिडीत महिलांना हवी असलेली मदत उपलब्ध करुन देणार आहेत. या निर्भया पथक वाहनांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजांकित करण्यात येणार आहे.    

सावली सेंटरमध्ये महिला सुरक्षा प्रकल्प...
नेरुळ मधील सावली सेंटर मधील तळमजल्यावर नवी मुंबई पोलिसांच्या वतीने महिला प्रकल्प सुरु करण्यात आले असून या प्रकल्पाचे उद्‌घाटन देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात असलेले महिला सहाय्य केंद्र या महिला सुरक्षा प्रकल्पात हलविण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयातच सदर केंद्र चालवले जात होते. या केंद्रात समुपदेशनसाठी येणाऱ्या कुटुंबाच्या बैठकीसाठी देखील पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे नेरुळ येथील सावली सेंटरमध्ये स्वतंत्र जागेत महिला सहाय्य केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्रातून आता अधिक तक्रार अर्ज निकाली काढण्यास गती मिळणार आहे.  

सायबर सेल ऐवजी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे...
भविष्यात सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ लक्षात घेवून त्यासंबंधीचे गुन्हे हाताळण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यांचा तपास तत्काळ करुन सायबर गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या ‘सायबर सेल'चे सायबर पोलीस ठाण्यात रुपांतर करण्यात आले आहे. नेरुळ, सेक्टर-७ मधील सावली सेंटर येथील पहिल्या मजल्यावर सायबर पोलीस ठाणे सुरु करण्यात आले आहे. या सायबर पोलीस ठाणेचे उद्‌घाटनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे येत्या काळात सायबर गुन्ह्यांशी संबंधित सर्व गुन्ह्यांचा तपास सायबर पोलिसांकडून करण्यात येणार आहे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उद्यानातील दुरावस्था दूर करण्यासाठी ‘आप'चे विभाग अधिकाऱ्यांना निवेदन