लवकरच महापालिका तर्फे सर्वसामान्य रुग्णांना मिळणार सुपर स्पेशालिटी सेवा
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेज प्रकल्पाचे सादरीकरण
नवी मुंबई ः ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले असून ३ मे रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी आ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, आदि उपस्थित होते. आजही सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बुध्दीमत्ता असुनही तरुण-तरुणींना डॉक्टर होण्यापासून वंचित राहावे लागत होते. याचा गंभीर विचार आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केला. त्यानुसार त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडिकल कॉलेजसाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे आज सर्वसामान्य रुग्णांना तसेच वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयामुळे फायदा होणार असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणींना मोठा लाभ मिळणार आहे.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडिकल कॉलेज ८.४० एकर क्षेत्रफळामध्ये उभारले जाणार असून त्यासाठी अंदाजे ८१९.३० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याकरिता आ. सौ. मंदाताई म्हात्रे आणि महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर सीएसआर निधीसाठी प्रयत्न करणार आहे. हॉस्पिटल तळमजला अधिक ९ एवढ्या मजल्याचे असणार आहे. तसेच कॅन्सर, हृदय, मेंदू विकार अशा अनेक मोठ-मोठ्या आजारांवर येथे सेवा दिली जाणार आहे. जे काही आजार असेल त्याच्या उपचाराकरिता लागणारी सर्व यंत्रणा, शस्त्रक्रिया आणि इतर सुविधा प्रस्तावित हॉस्पिटल इमारतीत प्रत्येक मजल्यावर उपलब्ध होणार आहे. तसेच सदर हॉस्पिटल मधील रुग्ण क्षमता ५०० बेडस् हुन अधिक असून हॉस्पिटल पूर्णतः सर्व सुविधांयुक्त बनणार आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
दरम्यान, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सुसज्ज आरोग्य सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे. पुढील काही वर्षात नवी मुंबईत होणारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडिकल कॉलेज नवी मुंबईकरांसाठी क्रांती ठरेल. नवी मुंबई हद्दीतील रुग्णांना उपचाराकरिता बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांना रोजगार देखील निर्माण होणार आहे. सदर प्रकल्प महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी तसेच नवी मुंबई महापालिका, सिडको मधील संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे उभा राहणार आहे. लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडिकल कॉलेज उभारणीची प्रक्रिया पूर्ण होणार असून सर्व कामकाज जलद पध्दतीने केल्याबद्दल सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आभार मानले आहेत.
बेलापूर येथील महापालिका मुख्यालयाजवळ असणाऱ्या सदर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडिकल कॉलेज जवळ पीजी/नर्सिंग शैक्षणिक वसतिगृह, पदव्युत्तर शैक्षणिक संकुल, अभियांत्रिकी यार्ड, रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना राहण्याकरिता धर्मशाळा, नर्सिंग वसतिगृह, अभ्यागत केंद्र, पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह, वाहनतळ आणि इतर अनेक सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच उभारल्या जाणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडिकल कॉलेजवर पूर्ण नियंत्रण नवी मुंबई महापालिकेचे असणार आहे. सदर प्रकल्पामध्ये अजून काही सेवा-सुविधा उपलब्ध करता येईल का? याबाबतही महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.