‘मनसे'चा रेल्वे प्रशासनाला इशारा
सीवुडस् स्टेशन मधील समस्यांबाबत ‘मनसे'ची स्टेशन मास्तरांशी चर्चा
नवी मुंबई ः सीवुडस् स्टेशन मधील अनेक समस्यांसंदर्भातील तक्रारी रेल्वे प्रवाशांनी ‘मनसे'च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. त्या समस्यांसंदर्भात ‘मनसे'चे शहर सचिव सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सीवुडस् रेल्वे स्टेशन मास्तर सुमित्रा गुंडाळ आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
स्टेशन परिसरातील स्वच्छता गृह अत्यंत गलिच्छ अवस्थेत असल्याची बाब ‘मनसे'च्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी स्टेशन मास्तरांच्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने काही दिवस स्वच्छता ठेवली; परंतु परत स्वच्छतागृह पूर्वीसारखे गलिच्छ झाले आहेत. रेल्वेने यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे. कंत्राटदाराला काम करणे झेपत नसेल, तर दुसरा कंत्राटदार नेमणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहच्या बाजुला असणाऱ्या ड्रेनेज लाईन मधून दुर्गंधी येते. यावर ‘रेल्वे'ने उपाययोजना करावी, असे शिष्टमंडळाने यावेळी सांगितले.
काही बाईकस्वार बिनदिक्कत पादचाऱ्यांसाठी असणाऱ्या भुयारी मार्गाचा वापर करतात. ते प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस नेमके काय करते? असा प्रश्न पडतो. रिक्षा स्टॅन्ड ते तिकीट खिडकी पर्यंत तसेच स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला आहे. रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी आहे, फेरीवाल्यांसाठी नाही याची जाणीव ‘रेल्वे'ने ठेवावी. सीवुडस् स्टेशनच्या पश्चिम दिशेला भुयारी मार्गालगत रिक्षा स्टँड आहे. तिथे BAR कोड लावावा. म्हणजे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकी पर्यंत येण्याची गरज भासणार नाही.
सीवुडस् स्टेशन पश्चिम दिशेला प्रवाशांसाठी असलेल्या वाहनतळावर संबंधित कंत्राटदारांची दादागिरी चालत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कंत्राटदाराने नेमलेल्या कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणीझाली आहे का? याची माहिती घ्यावी. रेल्वे पोलिसांनी सुध्दा प्रवासी भयमुक्त पध्दतीने वाहनतळाचा वापर करतील, असे वातावरण निर्माण करावे. तसेच या वाहनतळाच्या दराबाबत पारदर्शकता ठेवावी. तसा फलक दर्शनी भागात लावणे जरुरी आहे. वाहनतळाचे दर सेकंड क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना परवडतील, असेच असावेत, असे मुद्दे ‘मनसे'च्या शिष्टमंडळाने यावेळी स्टेशन मास्तरांकडे उपस्थित केले. त्यावर यापैकी BAR कोडचा विषय तात्काळ सोडवू तर इतर विषय सिडको अधिकाऱ्यांशी आणि वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करुन सोडवू, असे आश्वासन स्टेशन मास्तर गुंडाळ यांनी शिष्टमंडळाला दिले. तसेच केलेली कार्यवाही काही दिवसात लेखी स्वरुपात देण्याबाबतही त्यांनी आश्वस्त केले. दरम्यान, सीवुडस् रेल्वे स्थानकातील समस्यांचे तातडीने निवारण न झाल्यास ‘मनसे'च्या वतीने जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी स्टेशन मास्तरांना देण्यात आला.
‘मनसे'च्या शिष्टमंडळात नवी मुंबई शहर सचिव सचिन कदम, सीवुडस् विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, जनहित कक्ष उपशहरअध्यक्ष अंकुश सानप, उपविभाग अध्यक्ष राजेंद्र खाडे, शाखा अध्यक्ष दिलीप पाटील, मनविसे विभाग अध्यक्ष प्रद्युमन हेगडे, शंकर घोंगडे-पाटील, मयंक घोरपडे, अमित टोंपे, गजानन घोंगडे, आदिंसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.