शहरातील पाणीटंचाई दूर करा, पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करा आ. गणेश नाईक यांची महापालिका प्रशासनाला सूचना
शहरातील पाणीटंचाई दूर करा, पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करा - आ. गणेश नाईक
नवी मुंबई ः शहरामध्ये सुरू असलेली सर्व पावसाळापूर्व कामे नियोजनपूर्वक वेळेत पूर्ण करुन नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. आ. गणेश नाईक यांची ३ मे रोजी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये विशेषत्वाने पावसाळापूर्वक करावयाची कामे, नवी मुंबईकरांना भेडसावणारी तीव्र पाणीटंचाई, महापालिका आस्थापना वरील विविध संवर्गातील कंत्राटी तसेच ठोक आणि रोख मानधनावरील
कर्मचारी यांच्या मागण्या, परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या, शहरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा त्रास यासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सदर बैठकीस माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पावसाळापूर्व कामे नियोजित पध्दतीने वेळेवर पूर्ण करावीत. अनेक वेळा वस्तुस्थिती अशी असते की, पावसाळा सुरु होऊन देखील सुरुच असतात. परिणामी, नागरिकांचे हाल होत असतात. त्यामुळे रस्त्यांची कामे, नालेसफाई, मलनिःस्सारण वाहिन्यांची आणि गटार बांधणीची कामे पावसाळा सुरु होण्याअगोदर पूर्ण करावीत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असावा. अतिवृष्टी आणि पावसाळ्यातील अन्य संकटकालीन परिस्थितीमध्ये
बचाव कार्यासाठी यंत्रणा चौकस ठेवावी. निवारा शेड तसेच अन्नधान्याची उपलब्धता यांची तरतूद करावी, अशा सूचना आमदार नाईक यांनी या बैठकीत केल्या. पावसाळ्यामध्ये शहराचे अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थिती पासून बचाव करणाऱ्या सर्व होल्डिंग पाँडची सफाई करण्याची सूचना नाईक यांनी केली. दिघा पासून बेलापूर पर्यंत असलेले होल्डिंग पाँड वेळेत स्वच्छ करावेत असे सांगत नवी मुंबईतील पाणी टंचाईवर आमदार नाईक यांनी अतिशय आक्रमकपणे जनतेच्या भावना मांडल्या. प्रशासकीय काळामध्ये शहरात
पाण्याची समस्या वाढली. नवी मुंबईमध्ये पाणीटंचाईचे सबळ कारण नाही. शहरासाठी स्वतंत्र असे मोरबे धरण आहे, केवळ काही अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागतो आहे, असा आरोप त्यांनी केला.
मोरबे धरणाचे पाणी पनवेलच्या काही ग्रामीण भागामध्ये वळविण्यात येत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. संदीप नाईक यांनी बारवी आणि हेटवणे धरणातून नवी मुंबईला मिळणारा पाणी कोटा पुरेपूर काटेकोरपणे उपलब्ध करून घेण्याची मागणी यावेळी केली. त्याचबरोबर शहरातील सर्व भागात समान पाण्याचे वितरण झाले पाहिजे, अशी सूचना केली. तर नवी मुंबईकरांना तहानलेले ठेवून जर त्यांच्या वाट्याचे पाणी कोणी अन्यत्र वळवणार असेल तर ते सहन करणार नाही. शहरातील पाणीटंचाई लवकरात लवकर दूर करा अन्यथा लोकहितासाठी महापालिकेवर मोर्चा आणण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा देखील आ. गणेश नाईक यांनी यावेळी दिला. आयुक्त नार्वेकर यांनी पाणीटंचाई प्रश्नावर गांभीर्याने चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीमध्ये लोकनेते आमदार नाईक यांनी महापालिका आस्थापनेवर काम करणाऱ्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडल्या. आरोग्य खात्यातील औषध निर्माता वैद्यकीय समाजसेवक डेंटल हायजेनिक तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,प्रयोगशाळा सहाय्यक, ऑर्थोपेडिक तज्ञ आदि विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करुन त्यांना सेवेत कायम करण्याची मागणी केली. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना सहावा आणि सातवा आयोगाच्या वेतनातील फरकाची तफावत देण्याची सूचना केली. ठोक मानधनावरील
कर्मचाऱ्यांचे पगार वाढविण्यास सांगितले. महापालिकेतील कंत्राटी शिक्षकांना वेतन वाढ देऊन त्यांची सेवा मुदत वाढविण्याची सूचना त्यांनी केली.
परिवहन उपक्रमामध्ये बस संचलनासाठी सुमारे २५० वाहकांची बाह्य पध्दतीने भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेवर आमदार नाईक यांनी आक्षेप घेत बस वाहक परिवहन उपक्रमामार्फतच भरती केला जावा असे स्पष्ट करुन सदर भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली.
दरम्यान, सदर बैठकीमध्ये जवळजवळ सर्वच लोकप्रतिनिधींनी आ. गणेश नाईक यांच्या माध्यमातून अनधिकृत फेरीवाल्यांचा विषय उपस्थित केला. फेरीवाल्यांची दादागिरी, त्यांच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याविषयी आपल्या तीव्र भावना मांडल्या. त्यावर आ. नाईक यांनी अनधिकृत फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र पोलीस यंत्रणा उभी करण्याची सूचना केली. प्रत्येक विभागामध्ये २४ तास पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे सुरक्षारक्षक तैनात करावेत. अनधिकृत फेरीवाल्यांचा त्रास कमी करावा, असेही नाईक म्हणाले.