वाशी मध्ये ‘राष्ट्रवादी'तर्फे निदर्शने
शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी
नवी मुंबई ः ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी आपण अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा म्हणून राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना भावनिक साद घालण्यात आली आहे. त्याअनुषंगाने राज्यभरात ‘राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांकडून जागोजागी घोषणाबाजी केली जात आहे. नवी मुंबईत देखील ‘राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या नेतृत्वाखाली ३ मे रोजी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी घोषणाबाजी केली.
‘राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्याचा निर्णय २ मे रोजी घ्ोतल्यानंतर राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी पक्षाअंतर्गत पवार यांच्या या निर्णयाचा विरोध होत आहे. नवी मुंबईतही पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत आणि इतर पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी ३ मे रोजी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र जमून घोषणाबाजी केली. याप्रसंगी ‘राष्ट्रवादी'चे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जी. एस. पाटील, माजी नगरसेवक राजू शिंदे, ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस'चे जिल्हाअध्यक्ष अन्नू आंग्रे, यावेळी अध्यक्ष नामदेव भगत यांनी सांगितले की खा. शरद पवार राजकारणातील सर्वोच्च नेत्यांपैकी एक असून त्यांचे नेतृत्व आम्हाला लाभले, हेच आमचे भाग्य आहे. मात्र, शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद अर्थात नेतृत्व सोडण्याचा अचानक घेतलेल्या या निर्णयाने आम्हाला धक्का बसला आहे. आम्हा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोरकं झाल्याची भावना होत आहे. या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही एकत्रित येऊन सार्वजनिकरित्या राजीनामा मागे घेण्याची मागणी शरद पवार यांच्याकडे करीत आहोत, असे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी यावेळी सांगितले.