खाजगी सोसायट्यांच्या पुनर्निर्मितीचा प्रश्न मार्गी
श्री गणेश चे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार - अशोक गावडे
नवी मुंबई : नवी मुंबईतील सिडको निर्मित इमारतींच्या पुनर्बांधनीचा प्रश्न शिंदे - फडणवीस सरकारने गतिमान केला आहे मात्र, खाजगी हाऊसिंग सोसायट्याच्या पुनर्बांधणी अनेक जाचक अटी - शर्ती असल्याने तो मार्गी लागत नव्हता. सध्याच्या गतिमान सरकारने यात लक्ष घालून तो सोडवला आहे. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते श्री गणेश या नवी मुंबईतील पहिल्या खाजगी प्रोजेक्टच्या कामाचे भूमिपूजन होणार असल्याचे सूतोवाच माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी नेरुळमध्ये बोलताना केले.
नेरूळ मधील श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने माजी उपमहापौर अशोक गावडे यांच्या अभिष्टचिंतन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कारास उत्तर देताना गावडे पुढे म्हणाले की, नवी मुंबईतील घरांची मालकी आजही सिडकोकडे आहे. इथं राहत असलेल्या नागरीकांची घरे फ्री होल्ड करावीत यासाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा आशावाद गावडे यांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबईतील नागरिकांना विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एमआयडीसी, सिडको आणि नवी मुंबई मनपा आदी तीन ठिकाणी जावे लागत असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागते तरी या तिन्ही आस्थापिकांना एका छताखाली आणण्याची विनंती आपण सरकारकडे केली असल्याचे गावडे यांनी बोलताना सांगितले. मागील चाळीस वर्षाहून अधिक काळ समाजात कार्य करत असतात. समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. फेरीवाले, एपीएमसीमधील गाळेधारक, लघु व्यापारी, शाळा प्रवेश, विद्यार्थ्यांना होस्टेल
वा अन्य मदत, बेरोजगाराना रोजगार निर्मिती, गरजूंना वैद्यकीय मदत आदीचे प्रश्न विविध मार्गे सोडवण्याचा प्रयत्न केला विशेषतः मुंबईतून स्थलांतरित झालेल्या व्यापाऱ्याच्या घरांचा प्रश्न आपण सोडवू शकलो असल्याचे मोठे समाधान आपणास असल्याचे अशोक गावडे यांनी मनोगतात सांगितले.
यावेळी अशोक गावडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात डॉ. डी. आय पाटील विद्यापीठाचे अधिकारी डी. डी. कोलते , शिवसेना बेलापूर सहसंपर्क प्रमुख पाटील श्री गणेश हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष , आदींची त्यांच्या कार्यकर्तृत्वावर भाषणे झाली .यावेळी नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अशोक गावडे याना शुभेच्छा दिल्या .