महापालिकेच्या वतीने सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी
चोरी, लुटमारीच्या वाढत्या घटनांमुळे ऐरोलीकर त्रस्त
नवी मुंबई ः ऐरोली विभागात सोनसाखळी चोरीच्या (चेन स्नॅचिंग) घटनांमध्ये वाढ होत चालली असून महिला वर्गात या चेन स्नॅचर्सची दहशत निर्माण झाली आहे. चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यावेळी प्रसंगी नागरिकांवर हल्ले देखील होत आहेत. रस्त्यावर पार्क केलेली वाहने देखील चोरीला जात आहेत. त्यामुळे या घटनांना कायमचा आळा बसावा यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ऐरोली विभागात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी ‘आम आदमी पार्टी'च्या नवी मुंबई टीम तर्फे महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, सदर मागणीचे निवेदन ‘टीम आप नवी मुंबई'च्या वतीने महापालिका कार्यकारी अभियंता (विद्युत) सुनील लाड यांना देण्यात आले. ऐरोली, सेक्टर-१० मधील डीएव्ही शाळेच्या पाठीमागील रस्ता ते सेक्टर-१४ पर्यंतचा रस्ता या विभागात प्रामुख्याने सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. तसेच वाहने चोरीचे प्रकार देखील घडत आहेत. अशा गुन्ह्यांच्या वेळी प्रतिकार करणाऱ्या सामान्य नागरिकांवर देखील हल्ले होत आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सदर विभागात लवकरात लवकर सीसीटिव्ही कॅमेरे बसविल्यास अशा चोरीच्या प्रकारांना आळा बसेल. त्यामुळे ‘आम आदमी पार्टी'च्या वतीने महापालिका प्रशासनाकडे सदर ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
याप्रसंगी महापालिका कार्यकारी अभियंता सुनील लाड यांना निवेदन देताना ‘आप'च्या ऐरोली नोड महिला अध्यक्ष आरती सोनावणे, नवी मुंबई उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर, नवी मुंबई उपाध्यक्ष मानसी राऊत, बेलापूर नोड अध्यक्ष महेश क्षीरसागर, ऐरोली नोड अध्यक्ष नामदेव साबळे तसेच चंदन मढवी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.