महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

महाराष्ट्र भूषण पुरस्कार  सोहळ्याच्या आयोजकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - धनंजय शिंदे

नवी मुंबई ः १६ एप्रिल रोजी खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात १४ श्री सदस्यांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यू प्रकरणी सदर सोहळ्याच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘आम आदमी पार्टी-महाराष्ट्र'च्या वतीने ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, या अगोदर १८ एप्रिल रोजी ‘आप-महाराष्ट्र'च्या वतीने खारघर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली होती. पण, आज आठवडा उलटून गेला तरी सोहळ्याच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे सामान्य जनतेशी निगडीत असलेल्या सदर गंभीर घटनेबद्दल दिरंगाई न करता आणि कोणालाही पाठिशी न घालता लवकरात लवकर सोहळ्याच्या आयोजकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे निवेदन ‘आप-महाराष्ट्र' तर्फे राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे तसेच जनप्रतिनिधी खासदार राजन विचारे, विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे देण्यात आले.

याप्रसंगी ‘आप'चे राज्य सचिव धनंजय शिंदे, पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. जयसिंग शेरे, नवी मुंबई शहर कार्याध्यक्ष श्यामणाऊ कदम, आप महाराष्ट्रच्या वतीने, चिन्मय गोडे, ठाणे जिल्हा युवाअध्यक्ष, योगेश तिरुवा खारघर नोड अध्यक्ष तसेच राहुल रुपनार पनवेल जिल्हा मीडिया सेल हेड ह्याची पण उपस्थिती होती.

आम आदमी पार्टी सदर संवेदनशील घटनेसाठी न्यायिक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहे, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. कारवाईला विलंब झाल्यास आप महाराष्ट्र तर्फे जनहित याचिका, न्यायालयीन अर्ज तसेच उपोषण आदि संविधानिक मार्ग अवलंबले जातील. -धनंजय शिंदे, राज्य सचिव-आप महाराष्ट्र.

‘आप'च्या उत्कृष्ट जनताभिमुख कामे प्रत्यक्षात करुन दाखविणाऱ्या मनिष सिसोदिया आणी सत्येन्द्र जैन यांच्या सारख्या लोकप्रिय नेत्यांना फक्त चौकशीच्या आरोपाखाली महिनोंमहिने जेल मध्ये डांबून ठेवणारे प्रशासन, खारघरच्या १४ सामान्यांच्या सदोष मनुष्यवधास कारणीभूत ठरणाऱ्या घटनेवर आठवडा उलटून गेला तरी साधा एफ.आय.आर. देखील दाखल करुन घेत नाही. सदर बाब गंभीर असून, देशात हुकूमशाही चालू असल्याचे द्योतक आहे. -श्यामभाऊ कदम, जिल्हा कार्याध्यक्ष-आप नवी मुंबई.

यावेळी चर्चेदरम्यान पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सदर घटनेवर चौकशी समिती नेमण्यात आली असल्याचे  सांगितले. पण, एवढ्या गंभीर घटनेवर फक्त एक सदस्यीय समिती नेमून राज्य सरकार स्वतःची जबाबदारी झटकत आहे, असा सूर एकंदरीत दिसत आहे. आज देशात सर्वच स्वायत्त संस्था फक्त एका केंद्रीय सत्तेच्या इशाऱ्यावर चालत असल्याचे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे. -ॲड. जयसिंग शेरे, जिल्हा कार्याध्यक्ष-आप पनवेल.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महापालिकेच्या वतीने सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी