अमृत योजना अंतर्गत २७२ कोटींचा निधी मंजूर

 

‘बेलापूर'मध्ये विकास कामांना लवकरच गती

नवी मुंबई ः अटल मिशन फॉर रिजुवेनेशन ॲन्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत योजना) भारत सरकार तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत जून २०१५ मध्ये सुरु करण्यात आली आहे. अमृत योजना शहरी भागात गरीब आणि वंचित लोकांवर लक्ष केंद्रित करून जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी मुलभूत नागरी सुविधा पुरविण्याचा उपक्रम आहे. याच अनुषंगाने ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नवी मुंबई महापालिकेला २७२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरामधील विकास कामांना गती मिळणार असून अमृत योजना अंतर्गत पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याचा निचरा अशा अनेक कामांमुळे नवी मुंबईतील नागरिकांना पायभूत सुविधा निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षा, सार्वजनिक सेवांमधील सुधारणा, प्रमुख आर्थिक घडामोडींवरील प्रभाव, रोजगार निर्मिती, गरीब आणि सुविधाहीन लोकांना लाभ, कमी खर्चात जास्तीत जास्त सुविधांची निर्मिती होणार आहे.

अमृत योजना अंतर्गत आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून बेलापूर विधानसभा क्षेत्रात २७२ कोटी ९६ लाख ८० हजार ७०५ रुपये निधीमधून विविध कामे होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे जलसाठ्याचे पुनरुज्जीवन करणे. नेरुळ सेक्टर-२० आणि सेक्टर-२५ येथे सांडपाणी पंपिंग स्टेशनचे बांधकाम करणे आणि बेलापूर वॉर्डातील सेक्टर-६ येथे पंपिंग मशिनरी बदलणे. नेरुळ, सेक्टर-१ ए शिरवणे येथे सांडपाणी पंपिंग स्टेशनचे बांधकाम करणे आणि नेरुळ प्रभागातील सेक्टर-४ येथे पंपिंग मशिनरी बदलणे, सेक्टर-९ सानपाडा येथे सांडपाणी पंपिंग स्टेशनचे बांधकाम करणे आणि तुर्भे वॉर्डातील सेक्टर-३० वाशी येथे पंपिंग मशिनरी बदलणे, बेलापूर प्रभागासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचापुनर्वापर-पुनर्वापर (७.५ एमएलडी क्षमतेचा तृतीयक प्रक्रिया) प्रकल्प तसेच वाशी मधील सेक्टर-३, सेक्टर-१२ आणि सेक्टर-२८ येथे सीवेज पंपिंग स्टेशनचे बांधकाम करणे आणि बेलापूर प्रभाग येथे नवी मुंबईसाठी  २४े७ पाणी पुरवठा यंत्रणा बसविणे आदि विकास कामांचा समावेश असून सदर कामांचा लवकरात लवकर शुभारंभ होणार आहे, अशी माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

विरोधी पक्षनेते दानवे यांनी घेतली पोलीस आयुवतांची भेट