तुटलेले बाकडे अन्‌ चालण्याच्या मार्गिकेवरील तुटलेल्या लाद्या बदलण्याची मागणी

 नेरुळ मध्ये उद्यानाला बकालपणा!

नवी मुंबई ः नेरुळ, सेक्टर-४ मधील महापालिका विभाग कार्यालय समोरील उद्यानातील तुटलेले सिमेंटचे बाकडेे आणि पायवाटेच्या मार्गिकेवरील तुटलेल्या लाद्या बदलण्याची मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनातून केली आहे.

नेरुळ, सेक्टर-४ मधील महापालिका नेरुळ विभाग कार्यालयासमोरच महापालिकेचे क्रीडांगण आणि उद्यान आहे. या उद्यानात रहिवाशांना बसण्यासाठी असलेले सिमेंटचे बाकडे तुटलेले आहेत. सदर तुटलेले बाकडे गेल्या काही महिन्यांपासून त्याच जागेवर पडलेले आहेत. बाकडे हटविण्याचे सौजन्यही महापालिकेच्या संबंधित विभागाकडून दाखविण्यात आलेले नाही. याशिवाय उद्यानात असलेल्या चालण्याच्या मार्गिकेवर असलेल्या लाद्या तुटलेल्या आहेत, तर काही ठिकाणच्या लाद्या गायब झाल्या आहेत. तुटलेल्या सिमेंटच्या बाकड्यांमुळे रहिवाशांची उद्यानात बसण्यासाठी गैरसोय होत आहे. चालण्याच्या मार्गिकेवरील लाद्या तुटलेल्या असल्यामुळे उद्यानात चालताना ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. तुटलेले सिमेंटचे बाकडे आणि पायवाटेवर लाद्यांची समस्या यामुळे उद्यानाला बकालपणा आलेला आहे, असे विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुवतांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

सदर समस्या निवारणासाठी स्थानिक नेरुळ विभाग कार्यालयात सातत्याने लेखी पाठपुरावा करुनही समस्येचे निवारण होत नसल्याने महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करावा लागत आहे. उद्यानाला आलेला बकालपणा आणि स्थानिक रहिवाशांची उद्यानात होत असलेली गैरसोय पाहता संबंधितांना सदरची समस्या तातडीने निवारण्यासाठी निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 अमृत योजना अंतर्गत २७२ कोटींचा निधी मंजूर