पाणी समस्येविरोधात ‘मनसे'चे अनोखे आंदोलन ; पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर दर्शविणारे होर्डिंग

घणसोली मधील पाण्याच्या समस्येबाबत मनसे आक्रमक

नवी मुंबई ः घणसोली विभागामध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. दररोज नागरिक पाण्याच्या समस्या घेवून घणसोली विभाग कार्यालयात जात आहेत. परंतु, संबंधित अधिकारी मात्र नागरिकांना उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे घणसोली मधील पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या पाणी समस्येबाबत मनसे आक्रमक झाली आहे. पाणी समस्येविरोधात अनोखे आंदोलन छेडताना ‘मनसे'ने पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर दर्शविणारे होर्डिंग लावून अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.

सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु असून पाण्यासाठी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल महापालिकेला ‘मनसे'च्या वतीने वारंवार विनंती करुन पाणी  पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. पण, अद्याप पर्यंत घणसोली विभागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यास महापालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे ‘मनसे'च्या वतीने नागरिकांना जर तुमचा पाणी पुरवठा खंडीत होत असेल अथवा कमी दाबाने होत असेल आणि तुम्हाला पाणी मिळत नसेल तर तुम्ही पाणी पुरवठा अधिकारी  ०७६७८०८३५९४/०९७०२९९३३६९ या मोबाईल क्रमांक वर फोन करुन पाणी पुरवठ्याबाबत थेट जाब विचारु शकता, असे आवाहन ‘मनसे'चे आस्थापना शहर संघटक संदीप गलुगडे, घणसोली विभाग अध्यक्ष नितीन नाईक, रोहन पाटील, विशाल चव्हाण यांनी केले आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘काँग्रेस'चे जवाब दो मोदी जवाब दो आंदोलन