सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मनविसेची मागणी

युलू बाईकचे नुकसान करणाऱ्या तरुणांच्या टोळक्यांविरोधात मनविसे आक्रमक

नवी मुंबई - युलू बाईकचा गैरवापर करत नुकसान करणाऱ्या तरुणांच्या टोळक्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. या टोळक्यांवर महापालिकेच्या वतीने सानपाडा पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष योगेश शेटे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांना आज सोमवार, दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी ई-मेल द्वारे निवेदन दिले आहे. शहरात महापालिकेने ठिकठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या युलू बाईकचा तरुणांकडून गैरवापर होताना दिसत आहे. अनेकांना या ई बाईक उपयुक्त ठरत असतानाच, दुसरीकडे त्यांचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापरदेखील नजरेस पडत आहे. शहरात युलू बाईकचा वापर नोकरदार, कामगार वर्गांसह अनेक गरजू तरुणांना होत आहे. कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी युलू बाईक उपयुक्त ठरत आहेत. मोबाईलमध्ये असलेल्या अँप्लिकेशनच्या मदतीने कोणीही युलू बाईकचा वापर करू शकतो. त्यासाठीचे शुल्क देखील खिशाला परवडणारे असल्याने वाढत्या पेट्रोल दराच्या तुलनेत अनेकांकडून युलू बाईकला पसंती मिळत आहे. मात्र आता याच युलू बाईकचा तरुणांकडून गैरवापर होताना दिसत असल्याचे योगेश शेटे यांनी निवेदनात म्हटले आहे. 

रविवार, दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी काही धूम्रपान करणाऱ्या तरुणांच्या टोळक्याने युलू बाईकला लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर युलू बाईकवर दगड टाकून तिचे नुकसान देखील केले. हा प्रकार सानपाडा सेक्टर ४ येथे दुपारी अडीच वाजता घडला. यावेळी स्थानिक रहिवाशांनी तरुणांच्या टोळक्याला हटकले असता, त्यांनी तिथून पळ काढला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तसेच छायाचित्रे तेथील एका स्थानिक रहिवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्यामुळे सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता युलू बाईकचे नुकसान करणाऱ्या तरुणांच्या टोळक्यांवर सानपाडा पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही आपणांस करित आहोत. अन्यथा अश्या तरुणांच्या टोळक्याचा शोध घेऊन त्यांना 'मनसे' स्टाईलने चोप देत चांगलाच धडा शिकवण्याचा इशारा यावेळी योगेश शेटे यांनी निवेदनातून दिला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आ. मंदाताई म्हात्रे यांच्यातर्फे वाशीत मोफत तपासणी शिबीर