बाजार समितीवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक ?

वाशी ः वाशी मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मधील १८ पैकी १० सदस्य (संचालक) तांत्रिक दृष्ट्या अपात्र ठरल्याने केवळ ८ सदस्य शिल्लक आहेत. परिणामी संचालक मंडळाचा कोरम पूर्ण होत नसल्याने बैठका पार पडत नसून, कुठलाही धोरणात्मक निर्णय होत नाही. त्यामुळे सदर संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक का नेमण्यात येऊ नये?, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस पणन संचालकांनी उर्वरित ८ संचालकांना बजावली आहे. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मागील १० महिन्यांपासून मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मधील संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या दरम्यान सभापती अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर संचालक मंडळ कोरम पूर्ण नसल्याने बैठका ठप्प आहेत. तर संचालकांच्या अपत्रेबाबत शासन दरबारी आणि न्यायालयात सुनावणी सुरु असून, या सुनावणीवर तारखांवर तारखा पडत आहेत. दुसरीकडे संचालक मंडळाचा कोरम अपूर्ण असल्याने बैठका अभावी संपूर्ण निर्णय प्रकिया ठप्प आहे. यामुळे १८ पैकी १० संचालक अपात्र झाल्याने आणि संचालक मंडळातील सदस्यांकडे सोपविलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम नसल्याचा निष्कर्ष काढत पणन संचालक विनायक कोकरे यांनी संचालक मंडळ बरखास्त का करण्यात येऊ नये?, अशी विचारणा या संचालकांना केली आहे. तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरलेल्या संचालकांच्या संख्येमुळे बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरु नसल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करुन बाजार समिती बरखास्त करण्याची प्रक्रिया पणन संचालनालयाद्वारे सुरु करण्यात आली आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विविध तांत्रिक मुद्द्यांचा आधार घ्ोत पणन संचालकांनी ८ संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, १८ एप्रिल २०२३ पर्यंत लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. बाजार समितीच्या संबधित घटकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कामकाज करण्याकरिता गणपूर्तीअभावी तसेच समिती सदस्यांवर सोपविलेली कर्तव्ये पार पाडण्यास बाजार समिती असमर्थ असल्याने आणि त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या सक्षम नसल्याने ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'चे अधिक्रमण करणे आवश्यक झाले आहे. या नोटीसीवर संचालकांनी त्यांचा समाधानकारक खुलासा न केल्यास पणन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या आदेशाद्वारे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मनविसेची मागणी