‘सावरकर गौरव यात्रा'च्या निमित्ताने नवी मुंबईतील ‘भाजपा'च्या दोन्ही आमदारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार

‘सावरकर गौरव यात्रा'च्या माध्यमातून भाजपा आमदारांकडून शक्ती प्रदर्शन?

नवी मुंबई ः आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘सावरकर गौरव यात्रा'च्या निमित्ताने नवी मुंबईतील ‘भाजपा'च्या दोन्ही आमदारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.  कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कडून सतत होत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या होत असलेल्या अपमानाविरोधात ‘भाजपा'कडून आज २ एप्रिल रोजी राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहेत. नवी मुंबई मध्ये देखील ‘भाजपा'कडून ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात ‘सावरकर गौरव यात्रा'चे आयोजन करण्यात आले आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आज २ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता कोपरी नाका येथील ब्ल्यू डायमंड हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक-वाशी पर्यंत ‘सावरकर गौरव यात्रा'चे आयोजन करण्यात आले आहे.

तर ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ५ वाजता गोवर्धनी माता मंदिर प्रवेशद्वार, किल्ले गांवठाण ते छत्रपती शिवाजी महाराज चौक-वाशी पर्यंत ‘सावरकर गौरव यात्रा' काढण्यात येणार आहे.


दरम्यान, गेली तीन वर्षे विविध कारणांनी पुढे ढकलण्यात आलेली नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक नजिकच्या काळात जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेत जास्तीत जास्त आपले समर्थक निवडून आणण्यासाठी आ. गणेश नाईक आणि आ. सौ. मंदाताई म्हात्रे या दोघांमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यासाठी चढाओढ सुरु असल्याचे दिसून येते. त्याअनुषंगाने ‘सावरकर गौरव यात्रा'च्या माध्यमातून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नाईक आणि म्हात्रे समर्थकांनी कंबर कसली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नेरुळमधील प्रभाग क्र. ३१ मधील शिवसेना शाखेच्या वतीने विविध वयोगटातील मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित