नवी मुंबईत करावे गांव येथे उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर दर्ग्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी

टी.एस.चाणवय जवळील बेकायदेशीर दर्ग्यावर कारवाई करा - ‘मनसे'ची मागणी

नवी मुंबई ः ‘मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात माहीम येथील समुद्रात उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर दर्ग्याचा पर्दाफाश केला होता. याचवेळी महाराष्ट्रभरातील अनधिकृत दर्ग्यांवर सरकारने तत्काळ कारवाई करण्याची मागणी देखील राज ठाकरे यांनी केली होती. तसे न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः सदरचा प्रश्न मार्गी लावेल, असा गंभीर इशारा देखील दिला होता. याच धर्तीवर नवी मुंबईत करावे गांव, सेक्टर-४० येथे उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर दर्ग्यावर त्वरित निष्कासनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘मनसे'तर्फे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, सिडको व्यवस्थापकीय संचालक, वन अधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि टी.एस.चाणक्य मेरीटाईम बोर्डाकडे करण्यात आल्याचे ‘मनसे'चे प्रवक्ते तथा नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले.

सदर दर्गा टी.एस.चाणक्य मेरीटाईम बोर्डाला लागून असलेल्या मोकळ्या जागेत आणि जागा हडप करुन बांधण्यात आल्याचे ‘मनसे'ने म्हटले आहे. या दर्ग्यासाठी पामबीचला लागून बेकायदेशीर रस्ता देखील उभारण्यात आला आहे. दर्ग्या शेजारी कांदळवन, समोरच समुद्रकिनारा आणि दर्ग्या पासून काही अंतरावरच भाभा अणुसंशोधन केंद्र आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील सदर परिसर अतिसंवेदनशील असल्याचे गजानन काळे यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सदर दर्गा त्वरित निष्कासित करण्यात यावा. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे टी.एस.चाणवय जवळ सदर अनधिकृत बांधकाम तयार झाला आहे. सदर ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. सदर  जागेचा अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात वापर सुरु आहे. त्यामुळे सदर परिसरातील अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची मागणी ‘मनसे'ने केली आहे.

या जागेवरून बीएआरसी सारखी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण संस्था नजरेस पडते. त्यामुळे सदर परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असल्याचे ‘मनसे'ने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या सर्व बाबी लक्षात घ्ोता सदर अनधिकृत बांधकामाची चौकशी आणि पाहणी करुन येत्या १५ दिवसात तात्काळ पाडून ती जागा पूर्ववत करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दर्ग्याच्या बाजुलाच गणपती बाप्पाचे मंदिर बांधेल, असा इशारा देखील ‘मनसे'तर्फे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘सावरकर गौरव यात्रा'च्या निमित्ताने नवी मुंबईतील ‘भाजपा'च्या दोन्ही आमदारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार