नेरुळ मध्ये दोन दिवसीय महिला मेळावा संपन्न

प्रत्येक दिवशी महिला दिन साजरा करा - शर्मिला ठाकरे

नेरुळ ः महिलांनी रिकामे बसून आपला अमूल्य वेळ वाया न घालवता सतत काही तरी करत रहावे, असा सल्ला ‘मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी नेरुळ येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात उपस्थित महिलांना दिला.

 नेरुळ येथी समता महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन सप्ताह निमित्त महिलांसाठी दोन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.

सदर कार्यक्रमात महामंडलेश्वर शिवलक्ष्मी संजय झालटे यांनी आपल्या भाषणात महिला दिनाचे महत्व पटवून दिले. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ज्योती भालेराव, सुचित्रा कुंचमवार, ॲड. मिता गंगावणे, ज्योती जाधव, डॉ.मयुरी घोरपडे, माया घाटगे, मनिषा ठाकूर, अर्चना बागवान, प्रणाली पाटील, सारिका माळी, अरुणा यादव, ललिता बाबर आदि महिलांना सावित्रीबाई फुले पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या महिलांचा सत्कार शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नवी मुंबई जागरुक पोलीस पथकातील सदस्य सहा. पोलीस निरीक्षक डॉ विशाल माने यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला कक्षाची स्थापना करण्यात आले असून आपत्कालीन मदतीसाठी ११२ नंबर डायल करा, असे सांगितले. सदर मेळाव्यात रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पाककला स्पर्धा, फॅशन शो, गायनस्पर्धा, नृत्यस्पर्धा पार पडल्या. तसेच ‘स्त्री मुवती संघटना'च्या सदस्यांनी मुलगी झाली हो अशी समाजप्रबोधन करणारी नाटिका सादर केली. तर नितीश घाणेकर यांनी होम मिनिस्टर खेळ अनोख्या शैलीत रंगवला. यातील विजेत्यांना सोन्याची नथ, द्वितीय पारितोषिक डिझायनर साडी तर तृतीय बक्षीस गिपट हॅमपर देण्यात आले.  
दरम्यान, दोन दिवसीय महिला मेळाव्यासाठी परिसरातील तसेच नवी मुंबईतील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. समता महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घ्ोतले. समता महिला मंडळाच्या अध्यक्षा  फुलन शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘काँग्रेस ओबीसी विभाग'चे जिल्हाध्यक्ष संतोष सुतार याचे कोकण आयुवतांना निवेदन