विधानसभा निवडणुकीतही तोच गोंधळ !
देशातील महनीय व्यक्तींच्या फोन कॉलसह बस स्टॅन्ड, रेल्वे स्थानके यांसारख्या ठिकाणी अनाउन्समेंट करून लोकांना मतदानाचे आवाहन, मतदारांना करण्यात आलेले धार्मिक आवाहन हेयंदाच्या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य होते. इतक्या मोठ्या प्रमाणात जागृती करूनही दरवेळेस जे होते ते यावेळेसही झाले. लोकसभेच्या तुलनेत मुंबईतील मतटक्का वाढला असला तरी ज्या प्रमाणात जनप्रबोधन झाले होते त्या तुलनेने वाढलेली टक्केवारी नगण्य आहे. मतदारांतील निरुत्साह यंदा पुन्हा दिसला. यंदा उत्साही मतदारांची ठिकठिकाणी घोर निराशा झाल्याचे चित्रही अनेक ठिकाणी दिसले.
राज्यात काही ठिकाणच्या किरकोळ घटना वगळता यंदाची विधानसभा निवडणूक तशी व्यवस्थित पार पडली. ४१३६ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सरकारसह, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, आध्यात्मिक संस्था, संप्रदाय, मंडळे तसेच राजकीय पक्षांनीही यंदा बरेच परिश्रम केले. मतदान वाढावे यासाठी सामाजिक माध्यमे तसेच तंत्रज्ञानाचाही पुरेपूर वापर करण्यात आला होता, मतदारांना मतदानासाठी फार लांब जावे लागू नये म्हणून यंदा मतदान केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली होती. सामान्य नागरिकांनीही आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून आपल्या मित्र मंडळींना, फॉलोअर्सना मतदान करण्याचे आवाहन केले होते. देशातील महनीय व्यक्तींच्या फोन कॉलसह बस स्टॅन्ड, रेल्वे स्थानके यांसारख्या ठिकाणी अनाउन्समेंट करून लोकांना मतदानाचे आवाहन करण्यात आले; मतदारांना करण्यात आलेले धार्मिक आवाहन हें यंदाच्या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य होते. इतक्या मोठ्या प्रमाणात जागृती करूनही दरवेळेस जे होते ते यावेळेसही झाले. लोकसभेच्या तुलनेत मुंबईतील मतदानाचा टक्का वाढला असला तरी ज्या प्रमाणात जनप्रबोधन झाले होते त्या तुलनेने वाढलेली टक्केवारी अगदीच नगण्य आहे.
मतदारांतील निरुत्साह यंदा पुन्हा दिसला. असे असले तरी यंदा उत्साही मतदारांची ठिकठिकाणी घोर निराशा झाल्याचे चित्रही अनेक ठिकाणी दिसले. वयाची कितीतरी मतदारांची नावे त्यावेळेसही मतदार याद्यांमधून गायब झाली होती. मुंबईतील घरे भाड्याने देऊन राहण्यासाठी मुंबई बाहेर गेलेले अनेक जण मतदानासाठी मुंबईत आले होते. अशांपैकी अनेकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने त्यांना मतदान न करताच परतावे लागले. घरातील ४ सदस्यांपैकी एका सदस्याचे नाव मतदार याद्यांतून गायब झाल्याने ते शोधण्यामध्ये बुथवर बसलेल्यांची दमछाक होत होती. एकेकाचे नाव शोधण्यात बराच वेळ लागत असल्याने अनेक बुथवर नागरिकांचे मोठे घोळके झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. विशेष म्हणजे ज्यांनी लोकसभा निवडणुकीला मतदान केले अशांचीही नावे काही ठिकाणी लुप्त झाली होती. अनेक ठिकाणी मृत व्यक्तींची नावे मतदार याद्यांत पुन्हा समाविष्ट झालेली पाहायला मिळत होती. निवडणूका दर वर्षी होत नसल्या तरी निवडणूक आयोग निवडणूक जवळ आल्यावरच जागे होते का ? भारतात प्रत्येकाचे आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, बँकेतील खाती सरकारने एकमेकांशी लिंक करून घेतली आहेत. एकदा नोंदवलेली नावे अन्य कोणत्याही ठिकाणाहून लुप्त होत नाहीत मग मतदार याद्यांमधूनच ती कशी गायब होतात ? मृत व्यक्तीची सरकार दरबारी नोंद करणे आता सर्वत्र अनिवार्य करण्यात आले आहे. मृत व्यक्तीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र निघाल्यावरही मतदार याद्यांमधून ते नाव का काढले जात नाही किंवा एकदा काढलेले नाव पुढच्या निवडणुकीच्या वेळी यादीमध्ये कसे काय जोडले जाते ? निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम कोणाचे आहे ?
लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यात बराच कालावधी होता. या काळात याद्या अध्यवत का करण्यात आल्या नाहीत, असा संतप्त सवाल मतदारांच्या मनात निर्माण होताना दिसला. या गोंधळाला उत्तरदायी असणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. निवडणूक आयोगाचा हा भोंगळ कारभार नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी अविश्वास तर निर्माण करतोच, शिवाय बोगस मतदानासही वाव मिळवून देत आहे असे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले गेले आहे. याशिवाय अनेक मतदार याद्यांमध्ये महिला मतदाराच्या नावासमोर पुरुषाचे छायाचित्र तर पुरुष मतदारांच्या नावापुढे महिलेचे छायाचित्र लावल्याचे दिसून आले. काही मतदारांची नावे यंदा नेहमीच्या मतदान केंद्रात न येता भलत्याच मतदान केंद्रांना जोडली गेल्याने त्यांना विनाकारण धावपळ करावी लागत होती. काही ठिकाणी ईव्हीएम मशिन्स बंद पडल्याने मतदारांचा संताप अनावर झालेला पाहायला मिळाला.
राज्याचे भवितव्य ठरवणारी निवडणूक निर्विघ्न पार पडावी, नागरिकांनी या प्रक्रियेत एकदिलाने सहभाग घ्यावा यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो; मात्र प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि नागरिकांचा निरुत्साह यांमुळे हे गणित कधी साधलेच जात नाही. नागरिकांना पुन्हा पुन्हा आव्हान करूनही नागरिक आपली नावे मतदार याद्यांमध्ये आहेत कि नाही याबाबत आधीच खात्री करून घेत नाहीत. शहरासारख्या ठिकाणी आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. निवडणूक याद्यांमध्ये आपले नाव पडताळण्याची पद्धतसुद्धा प्रशासनाने अत्यंत सोपी केली आहे, तरीही नागरिक मतदार यादीतील आपले नाव शोधण्याचा प्रकार ऐन निवडणुकीच्या दिवशी करतात ज्यामुळे त्यांनाही हाल सहन करावे लागतात. केवळ मतदारांना मतदान करण्यास उद्युक्त करणे पुरेसे नसून घरोघरी जाऊन घरातील सर्व प्रौढ व्यक्तींची नावे मतदार याद्यांमध्ये समाविष्ट आहेत का? घरातील मृत व्यक्तींची नावे याद्यांतून काढली गेली आहेत का? नवीन मतदारांची नावे याद्यांमध्ये समाविष्ट झाली आहेत का? या सर्व पडताळण्या निवडणुकीच्या आधी व्हायला हव्यात त्यासाठी निवडणूक प्रशासनाने स्वयंसेवी संघटना आणि राजकीय पक्ष यांचे साहाय्य घ्यायला हवे. निवडणूक केंद्राच्या ठिकाणी मतदारांसाठी आवश्यक सुविधा करण्यात आल्या आहेत ना? ज्या ठिकाणी लोडशेडिंग केली जाते अशा केंद्रांमध्ये जनरेटर आदी व्यवस्था केलेल्या असाव्यात. सर्व मतदान केंद्रामध्ये पुरेशा सुविधांची उपलब्धता केल्याची खात्री प्रमुख पक्षांच्या स्थानिक प्रतिनिधींकडूनही आदल्या दिवशी करून घेतली जावी. यंदाच्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेतून निवडणूक प्रशासन, राजकीय पक्षांसह नागरिकांनीही बोध घेऊन त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. - जगन घाणेकर