शेजारी आणि शेजार‘धर्म'

शेजारी, पडोसी, नेबर यांना आपल्या जीवनात महत्व असते. व्यक्तीप्रमाणेच देशालाही शेजारी असतात. मित्र, शाळा-महाविद्यालय, अभ्यासक्रम, नोकरी, पति-पत्नी निवडता येतात; पण नातेवाईक आणि शेजारी निवडता येत नाहीत. ते असतात. ते आपोआपच लाभतात. आपल्याला वाटते की आपल्या घराला लागून असलेल्या शेजारच्या घरात कुणी गाजलेला संगीतकार, गायक, लेखक, अभिनेता, खेळाडू, शास्त्रज्ञ वगैरेंसारखे कुणी प्रतिभाशाली, नामांकित राहायला असावे. पण तसे होतेच असे नाही. ज्यांना चांगले नातेवाईक, शेजारी लाभले तो/ती नशिबवान! बाकीचे कमनशिबी..

   सुमारे ८३ वर्षांपूर्वी आपल्या पारतंत्र्याच्या काळात ‘शेजारी' नावाचा मराठी चित्रपट व्ही. शांताराम यांनी पडद्यावर आणला होता. केशवराव दाते, चंद्रकांत मांढरे, गजानन जागीरदार, जयश्री कामुलकर आदिंनी त्या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. दिवाळसणात नेहमी ऐकू येणारे, दाखवले जाणारे ‘लख लख चंदेरी तेजाची सारी दुनिया' हे गाजलेले गीत याच ‘शेजारी' सिनेमातले! जिवबा आणि मिर्झा या हिंदु व मुस्लिम शेजाऱ्यांची कथा त्यात वर्णिली आहे.  ‘पडोसन' म्हणजे शेजारीण!  या सिनेमाने मात्र हिंदी विनोदी चित्रपट विश्वात इतिहास घडवला. सुनिल दत्त, किशोर कुमार, मेहमूद, सायरा बानो, केश्तो मुखर्जी आदिंचा अभिनय आणि आर डी बर्मन यांचे संगीत यामुळे ‘पडोसन' सिनेमा हिंदी चित्रपट जगतात एक मैलाचा दगड मानला जातो. आजची युवा पिढीही ‘पडोसन'च्या गाण्यांवर डोलत असते! हे झाले चित्रपटांचे. प्रत्यक्ष जीवनात शेजारी तितके चांगले लाभतीलच याची काही शाश्वती नसते.

    चाळीतल्या सहजीवनाचे गोडवे सातत्याने गायिले जात असतात. तेथील आयुष्य कसे मोकळे ढाकळे होते, कुणीही कुणाच्या घरी कसे जाऊ येऊ शकत होते, भाजीच्या वाट्यांची देवाणघेवाण कशी होत होती, पाहुणे अधिक वाढल्यास रात्रीच्या मुक्कामासाठी तसेच विवाह, बारसे, पूजा, साखरपुडे अशासारख्या प्रसंगी शेजारचे लोक आपले घरही कसे वापरु देत असत याबद्दल नेहमी आता साठीच्या पुढे असलेली पिढी बोलत असते. त्यात तथ्यही आहे. आमची स्वतःची कल्याण येथे चाळ होती. तेथे राहणारे आमचे भाडेकरु, शेजारी यांची आम्हालाही अनेक प्रकारे मदत झाली आहे. त्यावेळी जात, धर्म, भाषा, प्रान्त यांच्या कसल्याच मर्यादा पाहिल्या जात नसत. आमच्या चाळीत बंगाली कुटुंब, बंगाली मुस्लिम (बांगलादेशी नव्हे!) हेही राहात असत.  माझ्या दोन्ही बहिणींच्या लग्नप्रसंगी आमचे सारे भाडेकरु, शेजारी राबले. आमच्यावर कोणताही ताण येऊ न देता आमच्या घरातील कार्ये त्यांनी पार पाडण्यास सर्वतोपरी सहकार्य केले, हे आजही मला लख्खपणे आठवते. ते गाव सोडुन आम्ही कल्याण पश्चिमेला शहरात राहायला गेलो. तेथे तर गुजरातीबहुल वस्ती होती. तळमजला (तेथे हॉस्पिटल!) अधिक चार मजली इमारतीतील सोळा कुटुंबांत केवळ दोनच मराठी परिवार व बाकी सारे गुजराती/जैन/अमराठी. तेथे असतानाच माझा विवाह मे महिन्यात झाला. त्यावेळी गावी गेलेल्या दोन गुजराती परिवारांनी स्वतःच्या घराच्या चाव्या आमच्याकडे दिल्या व आमची मोठीच अडचण सोडवली. हे सगळे आज आठवून शेजारी म्हणजे किती उपयुक्त घटक होता, आहे याची सत्यता पटते.

   मग माझ्या मनात विचार येतो की आपण जात, धर्म, भाषा, प्रान्त असे कसलेच अडथळे येऊ न देता शेजारपाजारच्या लोकांना आपले मानतो, तेही आपलेपणाने वागतात. मग शेजारधर्मात मिठाचा खडा पडतो तरी कसा? ‘काश्मिर फाई्‌ल्स' नावाचा सिनेमा दोन वर्षांपूर्वी येऊन गेला. त्यात अनेक वर्षे शेजारी राहणाऱ्या मुस्लिम परिवारातील एक सदस्य हिंदू परिवारातील कुटुंबप्रमुख कुठे लपला आहे ते हल्लेखोरांना दाखवतो व मग हल्लेखोर त्या पिंपावर अंदाधुंद गोळीबार करुन त्या हिंदूला ठार मारतात आणि त्याच्या कुटुंबाचीही वाताहत करतात, असे दृश्य आहे. काही वेळ धरुन चालू या की ‘सिनेमॅटिक लिबर्टी' घेण्यासाठी असले अतिरंजित, भडक  दृश्य त्यात टाकले गेले. पण प्रत्यक्षात काश्मिरमध्ये १९८८ पूर्वी अनेक हिंदु परिवार, पंडितांची कुटुंबे तेथील स्थानिक मुस्लिम परिवारांसोबत राहात होतीच की!  विश्वनाथ प्रताप सिंग व त्यांच्यानंतरच्या काही पंतप्रधानांच्या कार्यकाळात तेथील दहशतवाद्यांनी, धर्मवेड्यांनी काश्मिरातील पंडितांच्या परिवारांवर अत्याचार केले, त्यांना ठार मारले, त्यांच्या घरातील महिलांचा छळ केला, नेसत्या वस्त्रांनिशी त्यांना घरे सोडायला भाग पाडले, त्यांची देवळे पाडली, जमिनी ताब्यात घेतल्या. मग शेजारी शेजारी म्हणवणाऱ्या स्थानिक मुस्लिम शेजाऱ्यांनी त्यावेळी शेजारधर्म का बरे पाळला नसावा? कारण १९४७ सालीच धर्माच्या आधारावर अखंड भारताची फाळणी झाल्याने मुस्लिम लोकांना स्वतंत्र पाकिस्तान देश व काही कोटी रुपये दिल्यालाही बरीच वर्षे झाली होती. या अखंड व स्वतंत्र भारतातल्या काश्मिरी हिंदुंवर आपल्याच भूमीतून परागंदा होण्याची वेळ आली असताना त्यांचे मुस्लिम शांतताप्रिय शेजारी हातावर हात ठेवून गप्प का बरे बसले असावेत? ते अशावेळी शेजाऱ्यांवरील संकटसमयी पुढे धावून का बरे आले नाहीत? काश्मिरी पंडीत व त्यांची कुटुंबे स्वतःहुन आपली घरे, देवळे, जमिनी, मालमत्ता हे सारे मुस्लिम दहशतवाद्यांच्या हवाली करुन आनंदाने नाचत, गात काश्मिर सोडुन दिल्ली व इतर ठिकाणी राहायला गेले की काय? २००९ साली मी पहिल्यांदा काश्मिरच्या भूमीवर पाऊल टाकले. तेथील क्षीरभवानी (काहीजण खीरभवानी असेही म्हणतात!) मंदिर पाहायला गेलो असता त्या मंदिराला नेहमीप्रमाणेच संपूर्ण सुरक्षा दलांचा वेढा होता. तेथील सुरक्षा जवानांशी मी स्थानिक लोकांच्या वर्तनाबद्दल बोललो. तर ते म्हणाले की मंदिराला सुरक्षा पुरवली आहे म्हणून ते तुम्ही आता पाहताय तरी; नाहीतर येथील स्थानिकांनी ते केंव्हाच पाडुन टाकले असते. आजही अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर ‘ते आम्ही लवकरच पाडुन टाकू' असे म्हणणाऱ्यांत कोणत्या प्रकारचे भारतीय आघाडीवर आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. भारताशी बेईमानी करणाऱ्या मुसलमानांमुळे भारतात राहिलेल्या व याच देशाला जन्मभूमी, कर्मभूमी मानणाऱ्या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामांसारख्या सद्‌गुणी मोजक्या मुस्लिमांचे कर्तृत्व मात्र उगाचच झाकोळून गेल्यासारखे झाले आहे.

   पाकिस्तान (पु.भा.भावे हे लेखक या देशाला नेहमी ‘पापस्तान' म्हणायचे!) श्रीलंका, चीन, बांगला देश, नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार, मालदीव या देशांचा शेजार भारताला लाभला आहे. यातील पाकिस्तान हे धर्मवेडे राष्ट्र कायम भारताशी दुश्मनी ठेवून भारतात घातपाती कारवाया, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, अंमली पदार्थांचा व्यापार, नकली नोटांचा वापर या माध्यमांतून त्रास देण्यात आघाडीवर आहे. चीनचा दुटप्पीपणा आपण पाहिला आहे. या दोन्ही देशांनी भारताशी युध्द छेडले होते. बांगला देशाची निर्मितीच मुळी इंदिराजी गांधींमुळे झाली. तरीही तो देश उपकारकर्त्या भारताला विसरुन नमकहराम निघाला. श्रीलंकेच्या माणसांनी राजीव गांधी या भारतीय माजी पंतप्रधानांची हत्या केली आहे. हे असले काही दळभद्री शेजारी भारताला लाभले आहेत. भारताने स्वतःहुन कुणावरही आक्रमण केले नाही. पण या बाहेरच्या टोळीवाल्यांनी सतत या देशावर हल्ले करुन देवळे पाडणे, मुर्त्या तोडणे, शेतांचे नुकसान करणे, महिलांवर अत्याचार करणे, संपत्ती लुटणे असलीच कामे केली आहेत. यांना शेजारी म्हणायचीही लाज वाटते.

   आता ग्रामीण भारताचे नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे ग्रामसंस्कृती, त्यावेळच्या बारा बलुतेदारांमधील सामंजस्य, सामाजिक सौहार्द, जातीय-धार्मिक सलोखा हळुहळु लोप पावतो की काय अशी भिती निर्माण झाली आहे. महानगरांत चाळीस, पन्नास, ऐशी मजल्यांचे टॉवर्स उभे राहात आहेत. शेजारी कोण राहतोय हेच अनेकदा माहित नसते. चोरी झाली, खून झाला, आत्महत्या झाली, पोलीस आले की मग कळते की कुणी पाकिस्तानी, बांगलादेशी मुस्लिम दहशतवादी, नायजेरियन, मंगोलियन अंमली पदार्थांचा तस्कर, शरीरविक्रयांशी संबंधीत अफगाणी नागरिक तेथे राहात होते. अनेकदा इमारतीच्या आवारात अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या मुलांचे टोळके बसते; जुगारी, मुलींची छेड काढणारी, व्यसनी, टारगट, गुन्हेगारी वृत्तीची मुले सोसायटीत, अपार्टमेन्टमध्ये वावरतात. क्वचितप्रसंगी आपल्या शेजारच्या घरातही ते राहात असतात. मात्र शेजारी शेजारी राहुनही कुणाला याची भनक नसते. कारण हल्ली जो तो ‘स्वतंत्र' झाला आहे. प्रत्येक घर जणू ‘स्वयंपूर्ण' बनले आहे. कधी कधी शेजारचे लोक बदमाष आहेत, देशद्रोही-दहशतवादी-वाईट कामांत गुंतलेले आहेत..म्हणून त्यांच्याशी बाकीचे लोक संबंध टाळतात, त्यांच्या घराची पायरीही चढत नाहीत असेही पाहायला मिळते. हे सारेच आपल्या भूतकाळातील शेजाऱ्यांच्या चांगल्या,  सकारात्मक, सर्वधर्मसमावेशक प्रतिमेशी विसंगत आहे. शवय झाल्यास शेजाऱ्याला आपली मदत व्हावी, मदत न करता आल्यास किमान शेजाऱ्यांना त्रास तरी होऊ नये असे वागणारे शेजारी अनेक वर्षे होते. मात्र लोकांची अर्थव्यवस्था सुधारली, खिशात पैसा खुळखुळु लागला, शेजाऱ्यापाजाऱ्यांसोबत एकत्र बसून दिवाळी फराळ, साधा चिवडा, भेळ, पिठलं-भाकरी खाण्याऐवजी मॉलमध्ये आपल्याच कुटुंबसदस्यांना घेऊन जात तेथील चमचमीत महागड्या पदार्थांवर ताव मारण्याचे दिवस आले आणि वातावरण बदलू लागले...आणि ‘शेजारी' ही संकल्पनाही बदलत चालली असे समजायचे का?

-राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

विधानसभा निवडणुकीतही तोच गोंधळ !